ठाणे : ३० लाख वर्षांपूर्वी जन्म झालेल्या मानवाची तेव्हाची जीवनशैली निसर्गाशी सलगी ठेवणारी होती. आताची जीवनशैली मानवी शरीर रचनेस अपेक्षितच नाही. निसर्गाशी सतत संपर्कात राहा आणि रात्री आठ तास शांत-निर्मळ झोप घ्या. आरोग्याच्या समस्या भेडसावणार नाहीत, असा सल्ला डॉ. शेखर कुलकर्णी यांनी दिला.
३६व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफताना डॉ.शेखर कुलकर्णी यांनी जीवनशैली आणि आरोग्य यातील संबंध उलगडून दाखवले. यावेळी व्यासपीठावर सत्राचे अध्यक्ष डॉ. अमित जगताप आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर उपस्थित होते. मानवाची सध्याची जीवनशैली आणि त्यातून निर्माण झालेल्या आरोग्य विषयक समस्या याची उकल करताना डॉ.शेखर कुलकर्णी यांनी ३० लाख वर्षांपूर्वीचा मानव निर्मितीचा दाखला दिला. त्यावेळी मानव गुहेत राहायचा, कंदमुळे खायचा, जंगलात फिरायचा, शिकार करायचा आणि अंधार पडू लागला की गुहेत परतायचा. या जीवनशैलीला अपेक्षित मानवी शरीर रचना होती. जीवनशैली उत्क्रांत होत गेली. सध्या जी जीवनशैली आपण अंगिकारलेली आहे त्यासाठी हे मानवी शरीर तयारच नाही, त्यामुळेच नवनवीन आरोग्य समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत, असे डॉ.कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
डॉ. शेखर कुलकर्णी यांचा सल्ला
१० हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि माणूस एकाच जागी, समूहाने राहू लागला. जीवनशैलीच्या उत्क्रांतीचा हा महत्वाचा टप्पा होता. तेव्हापासून माणसाच्या खाण्याचे पदार्थ बदलले, सवयी बदलल्या, राहणीमान बदलू लागले, एकूणच मानवी शरीरात न्यूट्रिशनच्या समस्या सुरू झाल्याचेही डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले. हजारो वर्षांपूर्वीच्या सापडलेल्या मानवी कवट्यांमध्ये किडलेले दात आढळून आले नाहीत, पण आता प्रत्येकाला दातांची समस्या भेडसावत आहे, असा दाखला देत त्यांनी सध्याच्या खाण्याच्या सवयीवर टीका केली.
आरोग्य चांगले राखण्यासाठी डॉ.कुलकर्णी यांनी झोपेचे महत्व पटवून दिले. माणसाला रात्री आठ तास शांत आणि निर्मळ झोप आवश्यक आहे. कॉफीसारखे पेय आणि प्रकाश हे घटक निद्रानाशाला कारणीभूत ठरतात. झोपताना अंधारच हवा. ज्या ठिकाणी कृत्रिम प्रकाश आहे त्या ठिकाणी छातीचा कॅन्सर जास्त संभवतो. रात्र पाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये हा विकार जास्त आढळून आला आहे. झोप येत नसेल तर उगाच औषधे घेऊ नका, त्याने आरोग्याचा आणखी नाश होईल. निद्रा येण्यासाठी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्या. रात्री झोप येत नसेल तर गरम पाण्याची अंघोळ करा. उष्णता बाहेर पडून शरीराचे तापमान खाली येते आणि चांगली झोप लागू शकते. झोपताना गडबड, गोंधळ नको, अशा साध्या-सोप्या सूचनाही त्यांनी केल्या.
औषधांचा मारा टाळा
ताप येत असेल तर येऊ द्या. रोगाच्या पेशींशी शरीरातल्या सैनिक पेशी लढत असल्याने ताप येतो. त्याला लगेच घालवण्यासाठी औषधे घेऊ नका. काही दुखत असेल तरीही लगेच औषधे घेऊ नका. परिस्थिती बिकट वाटत असेल तरच औषधे घ्या. अँटीबायोटिक्समुळे शरीरात हानी होते.
ताणतणाव वाढू देऊ नका,निसर्गाशी मैत्री करा, विनोद बुद्धी ठेवा, कशावर तरी श्रद्धा ठेवा. श्रद्धेने माणसे बरी होताना मी पाहिली आहेत, असेही डॉ. कुलकर्णीं यांनी सांगितले. शरीराची भाषा समजून घ्या, शरीर आजाराच्या सूचना-संकेत देत असते, ते ओळखा. वेळीच तपासणी केली तर रोग हाताबाहेर जाणार नाही. खुर्चीवर फार वेळ बसू नका. खुर्चीवर बसणे हे धुम्रपानाएवढे घातक आहे. वेळ मिळेल तसे अनवाणी चाला, निसर्गाशी सलगी करा, आरोग्य राखण्यासाठी अशा सोप्या पद्धती अंगिकारा, असा सल्लाही डॉ.कुलकर्णी यांनी दिला.
स्रोत – ठाणे वैभव
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.