तंत्रज्ञानाने संपूर्ण मानवी जीवन व्यापून टाकले असून, जगाच्या सीमा ओलांडून माणूस समीप आला आहे. व्यवसाय, उद्योग, साहित्य, आरोग्य, मनोरंजन, संस्कृती, विज्ञान या सर्वच क्षेत्रांमधील विकासाची उंची वाढली आहे. कालानुरूप सगळ्याच क्षेत्रांनी कात टाकून जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये स्वत:ला पुढे ठेवले आहे. माणसाच्या रोजच्या जगण्यात कलेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये चौसष्ट कला मानल्या जातात व कलेच्या या प्रांतामध्ये आता जाहिरात ही पासष्ठावी कला समाविष्ट झालेली आहे. दररोजच्या व्यवहारामध्ये वर्तमानपत्र असो टेलिव्हिजन किंवा चित्रपट सगळ्याच क्षेत्रात जाहिरातीस मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. आज जरी रेडिओ, टीव्ही चालू केला तरीही जाहिराती पाहावयास किंवा ऐकायला मिळतात. बरीच सौंदर्य प्रसाधने, उत्पादने आदी उपयोगी वस्तूंच्या जाहिरातींचा मारा नेहमी ग्राहकांवर होत असतो.
जाहिरातीव्यतिरिक्त माणसाचा एक दिवससुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. इतक्या जाहिराती आपल्या दृष्टीस पडत असतात. या क्षेत्रातील करिअरच्या चांगल्याच संधी उपलब्ध होत आहेत. बऱ्याच परदेशी कंपन्या जाहिरात क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. अर्थातच हे क्षेत्र म्हणजे जग व्यापून टाकणारे ठरत आहे. आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न असतील म्हणजेच जाहिरात क्षेत्र हा एक करिअरचा पर्याय होऊ शकतो का? त्याकरिता नक्की काय पात्रता असावी? कोणते कौशल्य असावेत? अशा कोणत्या संस्था आहेत ज्या याचे प्रशिक्षण देतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित आपणास सापडू शकतील व आपल्यातून एखादा हरहुन्नर कलाकार जाहिरात क्षेत्राला मिळेल, अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही. जाहिरात क्षेत्रामध्ये सुरुवात करण्याकरिता पदवीधर असणे गरजेचे आहे. जाहिरात हे एक व्यापक क्षेत्र असून, त्याचे विविध विभाग पडतात. यात कामाचे तीन मुख्य भाग म्हणजे क्लाएंट सर्व्हिसिंग, मीडिया प्लानिंग, क्रिएटिव्ह रिसर्च या कामाचे भाग आहेत.
मीडिया प्लॅनर्स म्हणजे माध्यम सल्लागार हे जाहिरात संस्थांना योग्य त्या माध्यमामधून ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत असतात. नियोजित प्रकारे वृत्तपत्रे, नियतकालिके, मासिके अशी छापील माध्यमे आणि टीव्ही, इंटरनेट, रेडिओ, अशी इलेक्ट्रॉनिक कामंही ते करतात. एखाद्या ब्रॅण्डवर विशेष संशोधन करून ग्राहकांच्या किंवा वाचकांच्या सवयी लक्षात घेऊनच ब्रॅण्ड रिकॉल आणि त्याच्यासोबत निगडित मोहीम राबविण्याचे कामदेखील मीडिया प्लॅन करावे लागते. थोडक्यात मॅथ्स, एमबीए, स्टॅटिस्टिक्स व आकडेमोड करणार्या, सॉफ्टवेअर्स चलाखीने हाताळणार्या व्यक्तींना यासंदर्भात नोकरीकरिता प्राधान्य दिले जाते. तसेच विविध जाहिरात कंपन्यांना ते सल्लासुद्धा देण्याचे काम करत असतात.
ग्राहक हा जाहिरात संस्थेचा चेहरा असून, संस्थेची प्रतिमा त्यावरूनच जपली जाते. ग्राहकामार्फत त्यासंदर्भात विस्तृत माहिती घेतल्यानंतर अकाऊंट एक्झिक्युटिव्ह व अकाऊंट प्लॅनर हे ब्रॅण्ड पोझिशनिंग कशी करावी यासंदर्भात रूपरेषा आखतात. उत्कृष्ट जाहिरात संस्था एमबीए, तर इतर जाहिरात संस्था डिग्री किंवा डिप्लोमा, मार्केटिंग व मास कम्युनिकेशन प्रशिक्षितांना नोकरीकरिता प्राधान्य देण्यात येते. सगळ्यात जास्त कार्य या विभागामार्फत केले जाते. अकाऊंट्स विभागात बजेटनुसार काम करावे लागते. जाहिरात सेवा देण्याकरिता सेवा पुरविणारी ही शाखा आहे. ग्राहकाला देण्यात येणारी सेवा, त्याबाबतची नेमकी रणनीती, बजेट, त्याकरिता योग्य त्या प्रकारची माध्यमे निवडणे आणि यासंदर्भात चर्चा सातत्याने ग्राहक व आपल्या क्रिएटिव्ह टीमसोबत करत राहणे व शक्य असल्यास मीडिया प्लानिंग डिपार्टमेंटसोबत संपर्कात राहणे, मार्केट रिसर्च अभ्यासणे अशी कामे याअंतर्गत करावी लागतात. वारंवार चर्चात्मक मुद्यांना मूर्त स्वरूप देऊन ब्रॅण्ड व त्याची मार्केटमधील योग्य जागा ठरविण्याचे काम यातून केले जाते.

जाहिरात संस्थेमध्ये क्रिएटिव्ह विभागाचे काम शब्दांची योग्य निवड करून त्यांची जुळवाजुळव करणे आणि अचूक व्हिजुअल्स साधणे, जेणेकरून त्या माध्यमातून दर्शकाचे नेमके लक्ष वेधून घेऊन त्याचे ग्राहकात रूपांतर होईल व जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करून खपही वाढविला जाईल, अशा प्रकारचे काम या विभागात असते. क्रिएटीव्ह विभागाचेसुद्धा कॉपी व क्रिएटिव्ह असे दोन भाग पडतात. कॉपी विभागामध्ये शब्दांमधून ब्रॅण्डचा संदेश पोहोचवला जाईल अशा शब्दांची रचना करणे, जिंगल्स व डायलॉग तयार करणे अशी कामे केली जातात. तसेच क्रिएटिव्ह विभागामध्ये नाविण्यपूर्ण गोष्टी आणि कल्पनेवर काम केले जाते.मार्केट रिसर्च म्हणजे मार्केटमधील संशोधन जाहिरात संस्थेच्या माध्यमातून राबविल्या जाणार्या विशिष्ट ब्रॅण्डवरील जाहिरात मोहिमेचे आकडेवारीमधील होणारे चढ-उत्तर, परिणाम आणि त्याचे मोजमाप करण्याचे काम मार्केट रिसर्चमध्ये करावे लागते. यावर आधारित माहितीप्रमाणे, मीडिया प्लॅनर ब्रॅण्डची मार्केटमधील योग्य जागा ठरविण्याकरिता अचूक निर्णय प्रक्रिया ठरवतो. यामध्ये करिअर करण्याकरिता स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग, सॅम्पलिंग टेक्निक्स व सायकोग्राफिक्स या क्षेत्रामध्ये याकरिता प्रावीण्य असावे लागते.
आर्ट विभाग म्हणजेच कला ब्रॅण्डचा लूक व फिल कसा असावा हे ठरवण्याचे काम आर्ट विभाग करतो. याकरिता स्केचेस काढणे व त्यातील व्हिज्युअल्स, लोगो, हेडिंग, पिक्चर्स हे एका ठरावीक आणि मर्यादित जागेमध्ये बसवण्याचे काम या विभागात येते. कोणते फॉन्ट्स निवडावेत, फोटोग्राफिक ट्रिटमेंट कशी असावी, हे काम प्रामुख्याने आर्ट विभागाला करावे लागते. अप्लाईड आर्ट, एफ.बी.ए. अथवा ग्राफिक डिझाईनमधील डिग्री आणि याव्यतिरिक्त कॉम्प्युटर ग्राफिक्स, मल्टीमीडियामधील ज्ञान या क्षेत्रामध्ये काम करण्याकरिता महत्त्वाचे आहे. अद्यापही जाहिरात क्षेत्रामध्ये करिअर करण्याकरिता फार कमी महाविद्यालये पदव्युत्तर शिक्षण देतात. मीडिया प्लॅनिंग व क्लाएंट सर्व्हिसिंग हे विषय मास कम्युनिकेशनची पदवी घेतेवेळी पदवी शिक्षणामध्ये समाविष्ट असतात. जाहिरात क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याकरिता हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. परदेशातील ग्राहक मिळवायचे असतील, तर संवाद कौशल्य चांगले असणे क्रमप्राप्त आहे. या क्षेत्रामध्ये काम करताना उत्तम रूपात मानधन मिळू शकते. १९९२ साली भारतामध्ये सुरुवात झालेला हा उद्योग आजवर करोडो रुपयांची वार्षिक उलाढाल करत आहे. भारत ही जाहिरात कंपन्यांकरिता सतत विस्तारणारी मोठी बाजारपेठ असून, कष्टाची तयारी आणि सतत नावीन्यपूर्ण काहीतरी निर्माण करण्याची जिज्ञासा असणार्यांकरिता हे क्षेत्र खुणावणारे आहे. परिश्रमातून आपण कलेच्या क्षेत्रात नाव कमावू शकतो.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.