अमरावती : ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्यातील आरोग्य भरतीमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. आरोग्य भरतीमध्ये दलालांकडून जागा देण्यात येत असून लाखो रुपये आकारले जात आहेत. या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. आरोग्य भरतीवरुन एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून यामध्ये दलाल आणि मध्यस्थ यांच्यात आरोग्य भरतीसाठी लाखो रुपये मागण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील दलालाचा आरोग्य भरतीमध्ये हस्तक्षेप झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होता.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे की, हे प्रकरण धोकादायक आहे. यामधून फार मोठं प्रकरण समोर आल्याचे दिसत आहे. ही ऑडिओ क्लिप पाहिली तर अमरावती जिल्ह्यापुरती आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर संपुर्ण महाराष्ट्रातून लाखोंचा घोटाळा समोर येईल असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारने ज्या कंपनीला परीक्षेचे कंत्राट दिलं होते त्याचा मालक तुरुंगात जाऊन आला आहे. कंपनीकडून विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश कर्नाटकसारख्या राज्यात सेंटर दिले आहेत. या कंपनीला ६ राज्यात कंत्राट दिलं आहे. कंपनीकडून असा प्रकार घडला असून सुद्धा त्याच कंपनीला पुन्हा कंत्राट दिलं जात असून ६ कोटी रुपयेसुद्धा देण्यात आले आहेत. हे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? असा घणाघात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.
न्यासा कंपनी नॉट क्वालिफाईड असं लिहिण्यात आले असताना त्यांना परीक्षांची जबाबदारी कशी देण्यात आली. या संपुर्ण प्रकाराची सीआयडी चौकशी करण्यात आली पाहिजे. समाजातील सर्व घटकांची मुंल या परीक्षेसाठी तयारी करत आहेत. यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोकं आहेत. यामुळे या प्रकरणातील झारीतील शुक्राचार्य कोण हे समोर आलं पाहिजे अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
आरोग्य भरतीबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून यामध्ये भरतीसाठी लाखो रुपयांची मागणी करण्यात येत आहे. क्लास डी साठी ६ तर क्लास बी साठी १३ लाख रुपयांची मागणी करण्यात येत आहे. तसेच दलालाकडून काम शंभर टक्के होणार अशी हमी देण्यात येत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ माजली आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.