मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. युती आपली २५ वर्षे युतीत सडली. तीच माझी भूमिका आणि मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यानंतर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेचा समाचार घेतला. शिवसेनेसमोर आकडेवारी जाहीर करत फडणवीसांनी शिवसेनेवर पलटवार केला.
सुमारे २०१२ पर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. त्यांच्या युतीच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवताय का, बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले, असे तुमचे म्हणणे आहे का, अशी रोखठोक विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच सत्तेसाठी ज्या काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्याच्या गांधी कुटुंबीयांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासही एक ट्विट तरी केले हा, असे तर दाखवावे, असे आव्हान फडणवीस यांनी केले.
२३ जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींपासून शाहपर्यंत अनेकांनी ट्विट करत आदरांजली वाहिली. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीयच आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारे साधे ट्विटही केले नाही. आधी त्यांच्याकडून ट्विट करून दाखवा. ते ट्विटही करत नाहीत. तरीही तुम्ही त्यांच्या मांडिला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही. ज्यांना बाळासाहेबांना अभिवानद करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत तुम्ही आहात अन् वर आम्हाला ज्ञान पाजळता, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले.
भाजपसोबत लढलो असे सांगताना हे भाजपसोबत असताना पहिल्या क्रमांकावर गेले. भाजपला सोडल्यावर चौथ्या क्रमांकावर गेले याचा निर्णयही त्यांनी केला पाहिजे. कुणाकडे सडले. तेच तेच मुद्दे असतात. कदाचित शिवसैनिकांनाही तेच तेच भाषण पाठ झाले. राम जन्मभूमीच्या आंदोलनात कोण होते तुमचे? लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या. तुम्ही तोंडाची वाफ दडवली. कोण होते तुम्ही? राम मंदिर-बाबरी सोडून द्या. पंतप्रधान मोदींनी करून दाखवले असून, त्यांच्या नेतृत्वात राम मंदिर तयार होते आहे. तुम्ही साधा दुर्गाडी किल्ल्याचा आणि मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दरम्यान, रामजन्मभूमी आंदोलनावेळी शिवसेनेची लाट होती. ठरवले असते तर देशात आज शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, या दाव्यावर बोलताना, १९९३ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेने १८० उमेदवार दिले होते. त्यापैकी १७९ जणांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत सेनेने २४ उमेदवार दिले. त्यापैकी २३ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते, अशी आकडेवारीच फडणवीसांनी यावेळी मांडली.