
नागपूर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात पूरग्रस्तांना मदतीसंदर्भात काही मागण्या केल्या आहेत. या पत्रावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते. त्यामुळे मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे मदतीबाबत फक्त बोलून चालत नाही, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विजय वडेट्टीवार म्हणाले, “विरोधी पक्षाचे मागणी करणे हे काम आहे. ती त्यांची जबाबदारीच आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे मदत करताना काय अडचणी येतात ते त्यांनाही माहिती आहे. पूरग्रस्त भागांची पाहणी करताना त्यांच्या अनेक बाबी लक्षात आल्या असतील. मदतीबाबत फक्त बोलून चालत नाही. तर ती देताना अनेक अडचणी असतात. फक्त राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकारनेही मदत करावी, अशी जनतेची मागणी आहे. आम्ही मदतीसाठी तयार आहोत. आम्ही ती सुद्धा करु”, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com