हैद्राबाद /प्रतिनिधी – नाबार्ड आणि महिला अभिवृध्दी सोसायटी, आंध्रप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील बचत गटांच्या महासंघांसाठी झालेल्या सर्वंकष मूल्यमापनात महाराष्ट्रातील महिला विकासाची शिखरसंस्था असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ, (माविम) संचालित बचतगटांच्या महासंघाने अव्वल स्थान पटकावले आहे.
नाबार्डचे अध्यक्ष श्री.जी आर चिन्ताला आणि मुख्य महाव्यवस्थापक श्रीमती विजयालक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत ‘माविम’च्या ठाणे जिल्ह्यातील क्रांतीज्योती सीएमआरसी आनगावला एक लाख रू.रकमेच्या रोख पारितोषिकासह देशभरातून प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले. तर विभाग पातळीवर ‘माविम’च्या उत्कर्ष सीएमआरसी गोंदिया आणि तेजस्विनी सीएमआरसी भंडारा यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावत ‘माविम’च्या सातत्यपूर्ण यशात उल्लेखनिय भर टाकली. या पुरस्काराची रक्कम प्रत्येकी रु. २०,०००/- आहे. भारतातील पात्र 120 हून अधिक SHG महासंघांपैकी 13 महासंघांची निवड करण्यात आली.
यावेळी ”व्हीजन 2030” अंतर्गत भारतातील बचत गट व बचतगटांच्या महासंघांचे पुनरूज्जीवन या विषयावर झालेल्या परिसंवादात ‘माविम’च्या महाव्यवस्थापक श्रीमती कुसूम बाळसराफ यांनी माविमसह महासंघांची भविष्यकालीन उपयुक्तता यावरही प्रकाश टाकला.
या कार्यक्रमासाठी व पुरस्कार स्विकारण्यासाठी क्रांतीज्योती लोकसंचलित साधनकेंद्र, आनगावचे अध्यक्ष सौ शुभांगी शशिकांत जाधव, सौ अंजली कमलाकर ठाकरे – खजिनदार, श्रीमती – अरुणा विजय गायकवाड – व्यवस्थापक, गोंदिया जिल्ह्यातील उत्कर्ष लोकसंचलित साधन केंद्राचे श्रीमती मोनीता राणे, व्यवस्थापक व श्रीमती तुलसी चौधरी अध्यक्षा व भंडारा जिल्ह्यातील तेजस्विनी लोकसंचलित साधनकेंद्राचे श्रीमती भारती झंझाड – अध्यक्षा, श्रीमती वनमाला बावनकुळे – व्यवस्थापक हे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीमती कुसुम बाळसराफ, महाव्यवस्थापक (प्रकल्प), माविम यांनी पॅनलिस्ट म्हणून सहभाग घेतला. श्रीमती शितल लाड, विकास अधिकारी व श्रीमती अस्मिता मोहिते, जिल्हा समन्वय अधिकारी, ठाणे ह्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
देशपातळीवरील ‘माविम’च्या या अभूतपूर्व यशाबद्दल ‘माविम’ अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे यांच्यासह माविम टीमवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Copyrights & Credits – nationnewsmarathi.com