जालना : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेला आधीच १५० रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार, अजून रेल्वे गाड्यांची व्यवस्था कोकणात जाण्यासाठी केली जाईल अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते.
येणाऱ्या ७ तारखेला दादर स्टेशनवरून कोकणात जाण्यासाठी स्वतंत्र मोदी रेल सोडण्यात येणार असल्याचं देखील ते म्हणाले. गणपती उत्सवाच्या काळात लोकांनी निर्बध पाळले पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाशी आपण सहमत असून निर्बध लागू असताना देखील करोना काळात रेल्वे सोडायला आम्हाला अडचण नाही. मात्र, राज्य सरकारची सहमती त्यासाठी आवश्यक आहे असंही दानवे यांनी म्हटलं आहे.
खरंतर, गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असतो. त्या निमित्तानं दरवर्षी गणेशोत्सव काळात मुंबई, पुण्यातून गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. तसंच, गाड्यांच्या फेऱ्याही वाढवल्या जातात. यंदाही तशी सोय करण्यात आली आहे. मात्र, वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा पश्चिम रेल्वेनं फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सर्वप्रथम कोकणात गणपती स्पेशल ट्रेनच्या ७२ फेऱ्या होणार होत्या. त्यात आणखी ४० फेऱ्यांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यात आणखी ३८ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं यंदा गणेशोत्सव काळात कोकणात रेल्वेच्या तब्बल १५० फेऱ्या होणार आहेत. ३ ते १८ सप्टेंबर दरम्यान या गाड्या धावतील.
या संदर्भातील अधिसूचना काढण्यात आली आहे. यापुढंही देखील वेटिंग लिस्ट वाढल्यास फेऱ्या आणखी वाढवण्यात येतील, असं दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. ‘कोकणात जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची पूर्ण काळजी केंद्र सरकार घेईल. गणपती उत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाताना कोणालाही अडचण होऊ नये, असा केंद्राचा प्रयत्न असल्याचंही दानवे यांनी याआधीही सांगितलं होतं.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.