माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीवर साधला निशाणा आहे. “राज्याचे माजी गृहमंत्री असो किंवा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, त्यांचे कुठे हनीमून सुरू आहेत हे शोधून काढायला हवं. माध्यमांना जर ते कळलं तर तुम्ही त्याबाबात यंत्रणांना रिपोर्ट करा म्हणजे त्यांना लवकरात लवकर पकडता येईल,” असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला.

देशात नुकताचं कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना निरनिराळ्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी बोलताना ड्रग्स पार्टी प्रकरणावरही भाष्य केलं. “महाराष्ट्र प्रगतीत पुढे जावं की ड्रग्स कॅपिटल बनावं हे आपल्यालाच ठरवावं लागणार आहे.

ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या तरूणांना तुरुंगात टाकलं जावं हा माझा वैयक्तिक विचार नाही, परंतु त्यांना त्यातून बाहेर काढायला नको का? त्यांच्यापर्यंत ड्रग्स येतात कुठून, त्याचं नेटवर्क याबाबत माहिती मिळाली पाहिजे. या मुलांच्या समुपदेशनाची आणि त्यांना सुधारगृहात ठेवण्याची गरज असते,” असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याचा सवाल त्यांना करण्यात आला.

“तुम्ही कामं तशी करत आहात म्हणून तुमच्यावर आरोप केले जात आहेत. तुम्ही भजन म्हणताय म्हणून तुमच्यावर आरोप केले जात नाहीत ना? जर तुम्ही जलयुक्त शिवारवर आरोप करू शकता, तर आम्ही समोर दिसतंय त्यावर आरोप करायचे नाही का?,” असंही त्या म्हणाल्या. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचं बोलत असून चुकीचं घडल्यास गप्प बसणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी शिवसेनेचं मुखरच्र सामनावरही निशाणा साधला. “ते भाजपवर टीका करणार. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली तर त्यांचे वसूली सरकार कसे चालणार?,” असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.