नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबईमधल्या आयआयटी बॉम्बे या प्रतिष्ठित उच्च तंत्रज्ञान संस्थेने आपल्या माजी महिला विद्यार्थ्यांपैकी 30 जणींच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी ‘आयआयटी बॉम्बे जेन झिरो विमेन इनिशिएटिव्ह’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमामध्ये ‘हर स्टोरी-आयआयटी बॉम्बे जेन झिरो विमेन’ या रश्मी बन्सल( स्टे हंग्री, स्टे फुलिश या सर्वोत्तम खपाच्या पुस्तकाच्या लेखिका) यांनी लिहिलेल्या कॉफी टेबल बुकचे आणि एका पॉडकास्ट मालिकेचे देखील 23 सप्टेंबर 2022 रोजी आयआयटी बॉम्बेच्या संकुलात प्रकाशन करण्यात आले.
1958 मध्ये या संस्थेची स्थापना झाल्यापासून सुरुवातीच्या काळात या संस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व 30 माजी विद्यार्थिनींना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. रोहिणी गोडबोले[डिस्टिंग्विश्ड ऍलुम्ना(2004);एम.एसस्सी,1974, सिल्वर मेडालिस्ट]; ऑर्डर नॅशनेल डू मेरीट, ऑनररी प्रोफेसर, सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बंगलोर आणि डॉ. शारदा श्रीनिवासन[ डिस्टिंग्विश्ड ऍलुम्ना,(2022), बी. टेक. इंजिनिअरिंग फिजिक्स 1987) प्रोफेसर, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडीज, बंगलोर या दोन पद्म पुरस्कार विजेत्यांचा देखील समावेश होता.
पद्म पुरस्कार विजेत्या आणि भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी आणि ‘नायका’ कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ फाल्गुनी नायर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
अतिशय उत्साहाच्या वातावरणात प्रश्नोत्तराच्या सत्राचं संध्याकाळी आयोजन करण्यात आलं. आयआयटी बॉम्बेच्या तरुण, जिज्ञासू आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांनी एडलजी यांच्याशी त्याचबरोबर संस्थेच्या इतर माजी विद्यार्थांशी संवाद साधला
‘हर स्टोरी-आयआयटी बॉम्बे जेन झिरो विमेन’ आणि पॉडकास्ट मालिकेमध्ये संशोधन, व्यवसाय, अध्यापन, तंत्रज्ञान, सार्वजनिक सेवा आणि इतर अनेकविध क्षेत्रांमध्ये आयआयटी बॉम्बेच्या माजी महिला विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती देण्यात आली आहे. हे पुस्तक आणि पॉडकास्टमध्ये या माजी विद्यार्थिनींना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले, त्यातून त्यांनी जीवनात कोणते धडे गिरवले, त्याचप्रकारे आयआयटी बॉम्बेमधील त्यांचे शिक्षण आणि नेटवर्किंग अनुभव यांनी त्यांना कशा प्रकारे अतिशय खंबीर आणि सामर्थ्यशाली महिला बनवले, याचेही विवेचन करण्यात आले आहे.
1958 मध्ये या संस्थेची स्थापना झाल्यापासून सुरुवातीच्या काळात या संस्थेमधून पदवी मिळवणाऱ्या माजी महिला विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याच्या उद्देशाने ‘आयआयटी बॉम्बे जेन झिरो विमेन इनिशिएटिव्ह या उपक्रमाचा जन्म झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून ही संस्था आपल्या माजी महिला विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अभिवादन करत आहे आणि त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभव ऐकता आणि पाहता येणार आहेत. नव्या पिढीला सक्षम करणे विशेषतः तरुण महिलांनी शिक्षणासाठी आयआयटी बॉम्बे ची निवड करावी आणि माजी महिला विद्यार्थ्यांचा वारसा पुढे चालवावा हा या उपक्रमाचा व्यापक उद्देश आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी डी सी अग्रवाल, बी टेक(ऑनर्स), मेकॅनिकल इंजिनिअरिंग, 1969) आणि त्यांची पत्नी दिवंगत रेणू अग्रवाल यांनी औदार्याने दिलेल्या मदतीच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करणे शक्य झाले.
Copyrights & Credits – nationnewsmarathi.com