मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिच्या विधानावरुन संताप व्यक्त होत आहे. देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, त्या अगोदरचं स्वातंत्र्य हे भीकमध्ये मिळालं होतं, असं वादग्रस्त विधान कंगनाने केलं होतं. कंगनाच्या या विधानावरुन देशभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. आता खासदार अमोल कोल्हेंनीही कंगनाच्या विधानावर भाष्य केलं आहे. कंगनाच्या विधानसंदर्भात खासदार कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर,
एका शब्दात दुर्दैव अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली. तसेच, ज्या हजारो देशभक्तांनी, क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अवघ्या 23 व्या वर्षी फासावर असणाऱ्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सर्वांचं बलिदान, ज्यांनी आपलं रक्त सांडलं, या सगळ्यांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. गेल्या 75 वर्षात देश ज्या उत्क्रांतीतून गेलाय, त्या अनुषंगाने हे अत्यंत दुर्दैवी विधान आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केलाय, त्यांचा हा अपमान आहे. ज्यांनी हे विधान केलंय, त्यांनी आत्मपरिक्षण करावं. ज्या गोष्टीत आपलं काडीचंही योगदान नाही, त्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलून त्यांचा अपमान करू नये, देशाचा अपमान करू नये, असे डॉ. खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.