नाशिकच्या गोदावरी नदीच्या पात्रात बुडून ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिघांच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.Godavari river
गोदावरी नदीत तीन व्यक्तींचा बुडून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. पहिली घटना रामकुंडाजवळच्या गांधी तलावात घडली. एक कुटुंब देवदर्शनासाठी आले होते. या कुटुंबातील रावसाहेब महाजन यांचा पाय घसरला आणि ते गोदापात्रात कोसळले. त्यांना शोधण्यासाठी जीवरक्षकांनी प्रयत्न केले. मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने त्यांना अपयश आले. उशिराने त्यांचा मृतदेह हाती लागला.
दुसऱ्या घटनेत पाण्यात पडलेले रावसाहेब महाजन यांचा शोध घेताना जीवरक्षकांना एक मृतदेह आढळला. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता, तो ओवेस नदीम खान या अवघ्या अठरा वर्षांच्या तरुणाचा असल्याचे समजले. तिसऱ्या घटनेत साहील सलीम अन्सारी या अवघ्या बारा वर्षांच्या मुलाचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाला. तो नाशिकमधल्या बुधवार पेठेत राहायचा. साहील हा घरात कोणालाही न सांगता गोदापात्रावर अंघोळीला गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकमध्ये महिनाभरापासून जोरदार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. गंगापूर धरणातून गोदापात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरी नदीही ओसंडून वाहत आहे. हे लक्षात घेता गोदापात्राकडे फिरकू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.Godavari river
Credits and copyrights – nashikonweb.com