मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा तिसरा दिवस सभागृहाबाहेर घडलेल्या काही घटनांमुळे चांगलाच गाजला. सध्या शिवसेनेत साईडलाईन झालेले आमदार रामदास कदम शुक्रवारी विधिमंडळात आले होते. रामदास कदम यांच्या विधानभवनातील अगदी एन्ट्रीपासून ते त्यांच्या भाषणापर्यंत सगळ्याचा गोष्टींची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली होती.
रामदास कदम विधिमंडळाच्या पायऱ्या चढून जात असताना समोरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येत होते. चंद्रकांत पाटील यांचे कदम यांच्याकडे लक्ष नव्हते व ते पायऱ्या उतरुन बाहेर पडण्याच्या बेतात होते. तेव्हा अचानक रामदास कदम यांनी अचानक चंद्रकांत पाटील यांच्यासमोर गेले आणि ‘मी रामदास कदम’, असे सांगत स्वत:ची ओळख करुन दिली. त्यानंतर रामदास कदम यांनी शेकहँडसाठी हातही पुढे केला. रामदास कदम आपल्याशी अचानक अशाप्रकारे बोलतील याची अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनाही नव्हती. त्यामुळे थोडावेळ चंद्रकांतदादांनाही नक्की काय झाले, हे समजले नाही. त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि रामदास कदम यांच्यात मोघम चर्चा झाली आणि दोन्ही नेते हसऱ्या चेहऱ्याने आपापल्या मार्गाने निघून गेले.
या प्रसंगाची विधानभवनाच्या आवारात चांगलीच चर्चा रंगली होती. यापूर्वी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत रामदास कदम यांनी शिवसेनेत आपल्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले होते. मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, पण माझी मुलं निर्णय घ्यायला मोकळी आहेत, असेही रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केले होते. त्यामुळे रामदास कदम आणि चंद्रकांत पाटील यांची भेट नव्या राजकारणाची नांदी आहे का, अशी शंका अनेकजण बोलू दाखवत आहेत.
रामदास कदमांना विधानभवनाच्या गेटवर पोलिसांनी अडवलं
रामदास कदम यांनी आरटीपीसीआर चाचणी न केल्यामुळे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांच्याकडे करोना नेगेटिव्ह अहवाल नसल्यामुळे पोलीस त्यांना आत सोडायला तयार नव्हते. त्यामुळे अगोदरच अडचणींचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या रामदास कदम यांच्या अडचणीत भर पडली. त्यामुळे कदम प्रचंड वैतागले होते. कदम यांनी सुरक्षा रक्षकांसोबत वादही घातला. मात्र, तरीही त्यांना आतमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी फोनाफोनी केल्यावर बऱ्याच वेळानंतर त्यांना आत सोडण्यात आले. मात्र, रामदास कदम हे माजी विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, अनिल परब यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांचे दिवस पालटले आहेत. कदम यांना गेटवरच अडवण्याच्या घटनेचे अनेक राजकीय अर्थही काढले जात आहेत.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.