मुंबई : शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भातील बैठक गुरुवारी विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार नाना पटोले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे, विधी व न्याय विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, वैद्यकीय अधिकारी (गट- अ) संवर्गातील वैद्यकीय अधीक्षक, उपअधिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी (गट- ब) या पदांचे नव्याने सेवाप्रवेश नियमांचे प्रारुप वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात येत आहे. सेवाप्रवेश नियमांचे प्रारुपन तयार झाल्यानंतर या वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल.
सदर प्रस्ताव तातडीने मंत्रीमंडळ बैठकीत आणण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने आवश्यक ती तयारी करावी. कोविड काळात डॉक्टरांची आवश्यकता अधोरेखित झाली असून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची पदे तातडीने भरण्याबरोबर वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवा नियमित करण्यात यावी असे आमदार श्री. पटोले यांनी यावेळी सांगितले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.