मुंबई/प्रतिनिधी – राज्यात पूरपरिस्थिती गंभीर असून राज्य सरकारने कागदी घोडे न नाचवता सरसकट मदत आणि पुर्नवसन कार्याला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील पूर परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे.राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन धोरण कुचकामी असून दरवर्षी काहीही प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत.संभाव्य पूर परिस्थितीचे आकलन करण्यास सरकार आणि राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अपयशी ठरला आहे.पुरात नागरिकाची घरे, शेती, व्यावसायिक साधने, गुरे ढोरे, वाहून गेले किंवा पाण्याखाली गेले आहेत.मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. एकाच पावसाने राज्यातील सुमार दर्जाचे रस्ते, पूल ह्या पूरामुळे पुर्णतः वाहून गेले.त्याचा फटका संपूर्ण राज्यातील नागरिकांना बसत आहे.
सरकारने तातडीने पूरग्रस्तांना प्रत्येकी १० लाख जीवितहानी साठी आणि पाच लाख आर्थिक मदत त्यांचे बँक खात्यात सरसकट जमा करावी.शेतकरी आणि व्यापारी ह्यांना देखील पुर्नवसन पॅकेजची गरज असून शेतकऱ्यांना वीज बिल माफी त्यांच्या पाल्याना शैक्षणिक शुल्क माफी, शेतकऱ्यांना पाच लाख प्रत्येकी मंजूर करावे.
मागील वर्षी आलेल्या पुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली होती, अनेक बाधित पूरग्रस्त मदती पासून वंचित आहेत.मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी रस्त्यावर उतरून जनतेला मदत करावी, नुसते कागदी घोडे नाचवू नये,बचावकार्य आणि पुर्नवसन कार्य जलद गतीने करावे तसेच विरोधी पक्ष भाजपने देखील राजकारण न करता केंद्र सरकार कडून अर्थ सहाय्य मंजूर करून आणावे, असे आवाहन देखील वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्यांनी केले आहे.पुरानंतर संभाव्य रोगराई विरोधात आरोग्य विभागाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी देखील वंचितने केली आहे.
Credits and Copyrights – Stream7news.com