“अभिनंदन, तुम्ही आई होणार” ही गोड बातमी तुमच्या कानावर आल्यावर तुमचा आनंद काय गगनात मावेनासा होतो. हो ना… ही बातमी ऐकून रोमांचित झाला असलात तरीही दुसऱ्या क्षणाला तुमच्या मनात अनेक विचार येत असतील. गरोदरपणाबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचे कुतूहल तुमच्या मनात असते. हे लक्षात ठेवा तुम्हाला या प्रवासात सगळ्याच गोष्टी नव्याने उलघडू लागतील. गरोदरपणात (pregnancy) पडणारे प्रश्न, त्याबद्दल काही टिप्स आज आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला बाळाच्या जन्माची तयारी करण्यास उपयोग होऊ शकतो. कोणताही अडथळा न येता साधारण ७५ ते ८०% जोडप्यांमध्ये गर्भधारणेच्या बातमीचा आनंद घेता येतो, तर गर्भारपणाच्या या काळात स्त्रीच्या शरीरात कोणते बदल होतात? या काळात गर्भवती महिलांमध्ये बदलांमुळे कोणती लक्षणे दिसतात? तिला कोणते त्रास होतात? कोणती काळजी घेतली पाहिजे? आहार कसा असावा? इत्यादी बरेच प्रश्न आपण जाणून घेणार आहोत.
गरोदरपणाची सूचना ही तुम्हाला मासिक पाळी चुकण्यावरून मिळते. गर्भारपणाचा नक्की काळ किती आणि प्रसूतीची अपेक्षित तारीख कोणती, याचे केवळ एकच उत्तर आहे ते म्हणजे दोनशे ऐंशी दिवस अथवा चाळीस आठवडे असा असतो. समजा ज्या स्त्रीला आपल्या शेवटच्या मासिक पाळीचा पहिला दिवस माहीत असेल, तिला प्रसूतीची संभाव्य तारीख अगदी सहजरीत्या समजू शकते, मात्र ज्या स्त्रियांची मासिक पाळी अनियमित आहे, त्यांना ही तारीख ६ ते ७ आठवड्यांच्या आसपास केलेल्या सोनोग्राफीच्या सहाय्याने ठरवावी लागते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ही संभाव्य तारीख असून, प्रत्यक्षात प्रसूती या तारखेच्या आधी दोन ते तीन आठवडे होऊ शकते. तारीख उलटल्यानंतरही वैद्यकीय देखरेखीखाली थांबणे योग्य असते. हे गरोदरपण तीन काळांमध्ये विभागले जाते.
या काळात काय बदल होत असतात?
गर्भारपणाचे पहिले तीन महिने खूप महत्त्वाचे असतात. या काळात स्त्री अनेक नवीन मानसिक (Mental) व शारीरिक (physical) बदलांतून जात असते. त्यामुळे अधिक काळजी (Care) घेणे खूप महत्त्वाचे आहे. गर्भाच्या वेगवेगळ्या अवयवांची वाढसुद्धा याच काळात होत असल्यामुळे गरोदर स्त्रीने पहिल्या तीन महिन्यांमध्ये कटाक्षाने स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोणताही वास अथवा एखादा विशिष्ट वास सहन न होणे हे गरोदरपणामधील एक लक्षण आहे. काही जणींना तर या दिवसामध्ये काही खाल्ले तरीही मळमळते व उलटी होते. या त्रासाला मॉर्निंग सिकनेस असे म्हणतात. गर्भारपणामध्ये पहिल्या काही महिन्यांमध्ये हा त्रास जाणवणे अगदी सामान्य लक्षण आहे. काहीजणांना मॉर्निंग सिकनेस गरोदरपणाच्या बाराव्या आठवड्यांनंतर कोणत्याही उपचाराशिवाय आपोआप कमी होतो. विशिष्ट पदार्थाचे डोहाळे लागणे आणि इतर कोणतेही पदार्थ खाण्याची अजिबात इच्छा न होणे हासुद्धा एक बदल आहे. या दिवसांत तुम्हाला एखादा काही ठरावीक पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होत असते. असे झाल्यास घाबरून जाऊ नका. याला आपण डोहाळे असे म्हणतो. डोहाळे अगदी कोणत्याही पदार्थांचे असू शकतात. सतत होणार्या उलट्यांमुळे आणि पुरेसे अन्न पोटात न गेल्यामुळे तुमच्या शरीरामधील रक्तदाबावर परिणाम होतो आणि थकवा जाणवतो. या काळात जर आहारामध्ये योग्य बदल केल्यास तुमचा त्रास कमी होतो. या काळात तुमचे अचानकच वजन कमी होत असेल, तर तुम्ही लगेच घाबरून जाऊ नका. कारण पहिल्या तिमाहीमध्ये दोन किलोंपर्यंत वजन कमी होणे सामान्य आहे.
गर्भारपणामध्ये वारंवार सतत लघवी होणे हे नॉर्मल आहे. पहिल्या तिमाहीपासून गर्भाशयाच्या वाढीमुळे मूत्राशयावर दाब येतो. त्यामुळेच युरिन थांबवणेसुद्धा कठीण होते. हार्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळेही युरिनचे प्रमाण वाढते. स्तनांचा आकार वाढतो. गरोदरपणामध्ये प्रसूतीनंतर स्तनपान करण्याकरिता पोषक व पूरक असे बदल आधीपासूनच स्तनांमध्ये होतात. पहिल्या तिमाहीपासून स्तन हळुहळु वाढू लागतात. जड आणि अधिक संवेदनशील होतात. ३० व्या आठवड्यांपासून ते स्तनपानाकरिता योग्य होतात. अपचनामुळे तुम्हाला छातीमध्ये बद्धकोष्ठ व जळजळचा त्रास जाणवण्यास सुरुवात होऊ शकते. गरोदरपणात पोट पुढे आल्यामुळे आणि दोन जेवणांत बरेच अंतर पडल्यामुळे असिडीटी होते व छातीत जळजळण्याचा त्रास होतो. शरीरीत होण्यार्या हार्मोन्सच्या बदलामुळे (hormonal changes) एक्ने, पिगमेंटेशन (pigmentation), स्ट्रेच मार्क (stretch marks) अशा समस्या होणे हे सामान्य आहे.

कधी कधी प्रेगन्सीची लक्षणे फायदेशीरदेखील ठरतात. यामध्ये हार्मोन्सच्या (hormonal) पातळीत होणाऱ्या बदलामुळे तुमच्या केसांचा पोत सुधारतो. केस अधिक जाड व चमकदार होतात. ९ व्या आठवड्यापासून गर्भाच्या हालचाली सुरू होतात, परंतु पहिल्या गरोदरपणात तुम्हाला त्या अठरा अथवा एकोणीसाव्या आठवड्याने जाणवू लागतात. तुमच्या बाळाच्या या हालचालींमुळे तुम्हाला रात्री शांत झोपसुद्धा लागणे कमी होत असते. मूड बदलतो. शरीरामध्ये जाणवणारे बदल आणि अतिवजन, हार्मोन्सच्या बदलामुळे तुम्हाला अधिकच थकवा जाणवत असतो. अशा परिस्थितीत कंटाळा येणे स्वाभाविकच असून, त्याचा तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. योग्य आहार, मेडिटेशन, योगासने आणि व्यायाम याची तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण आणण्यास मदत होऊ शकते. अपुरी झोप या दिवसांत तुमच्याकरिता गरजेची असली, तरी ती घेणे तुम्हाला शक्य होत नाही. तिसर्या महिन्यानंतर अपुर्या झोपेची तुम्हाला सवय होते. कारण वाढलेले पोट, वजन आणि थकवा, गर्भाच्या हालचाली, लघवीला सारखे उठणे या गोष्टींमुळे तुम्हाला पुरेशी आणि स्वस्थ झोप घेणे जमत नाही.
मातेचा आहार कसा असावा ?
जेव्हा महिला गर्भावस्थेत असते त्यावेळी तिने खाण्या-पिण्यावर अधिक लक्ष देण्याची गरज असते. अशा अवस्थेत त्यांना सर्वसाधारण नेहमीपेक्षा अधिक ऊर्जा (energy) व कॅलरीची (calories) गरज असते. मातृत्व व मुलं या दोघांना एकाच प्रमाणात कॅलरी मिळणे गरजेचे असल्यामुळे त्याकरिता गर्भवती महिलांनी (pregnant women) खाण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. गरोदर असताना फळे व ज्यूस जास्त फायदेशीर ठरू शकते. फळे खाल्ल्याने प्रोटीन, कॅल्शियम, सिलिकॉन मिळते. तसेच ज्यूस घेतल्यामुळे शरीर ताजेतवाने होते, परंतु ज्यूस पिताना लक्ष ठेवावे की ते ताज्या फळांपासून बनवलेले असावे. टेट्रा पॅक ज्यूस पिऊ नये. पालकसोबत ऑम्लेट खाल्लास ते जास्त फायदेशीर असते. यातून एकूण एकेचाळीस कॅलरीसोबत लोह (Iron), फॉस्फरस (phosphorus), अॅसिड (acid) व कॅल्शियम ( calcium) मिळते. आहारामध्ये कॅल्शियमसारख्या पूरक घटकांचा समावेश असावा. रोज सहाशे मिली दूध वा दुधजन्य पदार्थ नियमित घ्या. व्हिटॅमिन डी मिळविण्याकरिता अंड्यामधील पिवळा भाग, फिश लिवर ऑईल यांचा समावेश करा आणि कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरल्यामुळे पुरेसे व्हिटॅमिन डी मिळू शकते. पहिल्या तीन महिन्यांच्या काळात बाळाच्या वाढीकरिता तुमचे वजन अंदाजे ०.५ ते २ किलोंनी वाढणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम करा, ज्यामुळे तुमची शारीरिक क्षमता वाढेल आणि पाठदुखीपासून तुम्हाला आराम मिळेल. त्यामुळे तुम्ही शारीरिक बदलाला सहज सामोरे जाऊ शकाल. नियमितपणे डॉक्टरकडे जाऊन चेकअप केल्यामुळे गर्भाच्या वाढीवर नीट लक्ष देता येते आणि त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यास मदत होते.

प्रेग्नसीमध्ये काळात काय टाळाल ?
सगळ्यात प्रथम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेणे टाळावे. कारण औषधांच्या अतिसेवनामुळे तुमच्या गर्भावर दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. खाणं काबूत ठेवा. नवनवीन अन्नपदार्थ आजमावून पाहणे शकतो टाळा. अर्धे कच्चे राहिलेले मांसाहारी पदार्थ, चीज, समुद्रातील मासे अशा पदार्थांमधून हानिकारक जीवाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे बाळाच्या वाढीवर दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे बाळाच्या अकाली जन्माची शक्यता वाढते, तर धूम्रपानाच्या सवयीमुळे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचेसुद्धा आढळून येते. शक्यतो या काळात अतिताण, नैराश्यमध्ये राहणे चांगले नसते, कारण गरोदर स्त्रीच्या अतिरिक्त मानसिक तणावामुळे गर्भपात होण्याची शक्यता सुद्धा तेवढी जास्त असते. गर्भारपणात डाएट करणे टाळा. यामुळे तुम्ही आणि तुमचे बाळ व्हिटॅमिन, आयर्न आणि फॉलिक अॅसिड, खनिजे यांसारख्या अत्यावश्यक पोषकद्रव्यांपासून दूर राहाल. खूप गरम पाण्याने स्नान करणे टाळावे, कारण यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. परिणामी याचा बाळालादेखील त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. वर दिलेल्या माहितीनुसार, काही गोष्टी करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तसेच तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करूनच या लेखात दिलेले उपाय करून बघा, कारण एखादी गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत वेगळी असू शकते. याकरिता डॉक्टरांचा सल्ला घेणेच फायदेशीर ठरेल.
– हेमा निचरे
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.