मुंबई : राज्यातील सर्व पात्र नागरिकांना येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज सर्व राज्यांचा कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत श्री. टोपे मंत्रालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास उपस्थित होते. श्री. टोपे यांनी सांगितले की, राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने व्यापक प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणाची गती वाढावी यासाठी मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ्य सारखे अभियान राबविण्यात आले. याचा लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी फायदा झाला. आता लसीकरणाची शिबीर आणि वेळही वाढवली जात आहे.

लसीकरणाच्या मोहिमेत आरोग्य, महसूल, नगरविकास, शिक्षण अशा विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी एकत्रित काम करीत आहेत. लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. यासाठी ओपिनियन लीडर्स, धर्मगुरु यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. कोविड प्रतिबंधात्मक कोवैक्सिन लशीच्या दोन मात्रांमध्ये २८ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांमध्ये ८४ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे.
कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रा मधील अंतर कमी केले तर लसीकरणाच्या वेगाला गती देता येईल. याबाबत विचार केला जावा अशी विनंती श्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांना केली. मुंबई मध्ये लोकल ट्रेन मध्ये प्रवास करायचा असेल तर लशींच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यावर ही अतिशय चांगली कल्पना आहे, असे श्री. मांडविया यांनी सांगितले. या आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विविध राज्यांचे आरोग्य मंत्री, आरोग्य विभागाचे सचिव, लसीकरण अधिकारी सहभागी झाले होते.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.