रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी विचार केला जाईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी विधानसभेत दिले. त्याचबरोबर 108 क्रमांकाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील एक हजार रुग्णवाहिका टप्प्याटप्प्याने बदलण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना आमदार राजन साळवी यांनी राजापूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकांचे मानधन अदा करण्याबाबत संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना राज्यात 108 रुग्णवाहिकांची अवस्था वाईट असून त्यांची दुरुस्ती करण्याची मागणीही साळवी यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत शेखर निकम, हरिभाऊ बागडे यांनीही भाग घेतला. या रुग्णवाहिकांवरील स्टाफ अटेंडंटने तीन हजार हे मानधन अल्प आहे ते वाढवण्याची मागणी शेखर निकम यांनी केली.
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकांच्या चालकांच्या थकलेल्या पगारांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याची घोषणा राजेश टोपे यांनी यावेळी केली. या कंत्राटी कर्मचाऱयांचा पगार देण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असून 36 कोटींचे वितरण ताबडतोब होईल. तत्पूर्वी थकलेले 10 कोटी आणि नव्याने 26 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहितीही त्यांनी दिली.
या चर्चेला उत्तर देताना राजेश टोपे पुढे म्हणाले की, 102 या क्रमांकाच्या नवीन रुग्णवाहिका आपण ग्रामीण भागात देत आहोत. तसेच 108 रुग्णवाहिका नव्या घेण्याची योजना आहे. शासनाचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर आमदार निधीतून शववाहिका आणि रुग्णवाहिका चालवल्या जातात. त्यातील डिझेल आणि चालकांच्या पगाराची सोय राज्य सरकारकडून केली जाईल का? असा प्रश्न सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला होता. यावर राजेश टोपे यांनी सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत यावेळी दिले. तर राज्यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱया रुग्णवाहिकेच्या चालकाला 15,800 रुपये पगार मिळायला हवा. तसेच पीएफ आणि कर्मचारी राज्य विमा योजनेची सुविधाही कंत्राटदाराने करायला हवी. जर तशी तरतूद केली नसेल तर कंत्राटदारावर कारवाई होईल, असेही राजेश टोपे यांनी जाहीर केले.