मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता गुलाब नावाचे चक्रीवादळात झाले असून, हे चक्रीवादळ रविवारच्या सायंकाळी ओरिसा – आंध्रप्रदेशच्या किनारी भागात धडकणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हे चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जर का ही शक्यता खरी ठरल्यास राज्यात २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ब-यापैकी पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल झाले असून, २६ सप्टेंबर रोजी दक्षिण ओरिसा, छत्तीसगड, आंध्रप्रदेशच्या समुद्राचा उत्तरेकडील भाग, तेलंगणा, उत्तर छत्तीसगड आणि उत्तर ओरिसामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळले. २७ सप्टेंबर रोजी विदर्भ, दक्षिण छत्तीसगड, ओरिसा, मराठवाडा, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल किनारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळले. दरम्यान, सोमवारपासून राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून, हवामानात झालेल्या बदलामुळे पूर्वेकडील समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. रविवारी सायंकाळी हे चक्रीवादळ ओरिसा आणि आंध्रप्रदेशच्या किनारी धडकेल. या चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. २७ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. वेगाने वारे वाहतील. कोकणात २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान वा-याचा वेग वाढेल. काही ठिकाणी मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग यांनी वर्तविला आहे.
अलर्ट
२७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
२८ सप्टेंबर रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
२६ सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
२७ सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल.
२८ सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. उत्तर किनारपटटीवर सोसाटयाचा वारा वाहील.
२९ सप्टेंबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. उत्तर किनारपटटीवर सोसाटयाचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.