जळगाव : सिंधुदुर्गातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेना व राणे कुटुंब पुन्हा एकदा आमने-सामने आलं आहे. गुन्हा दाखल होताच नीतेश राणे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी राणे कुटुंबीयांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
फडणवीसांच्या या टीकेवर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील बलात्कारी व दरोडेखोरांना पकडायला महाविकास आघाडी सरकार व पोलिसांना वेळ नाही. पण केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर नोटिसा चिकटवायला ह्यांच्याकडं वेळ आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. त्याबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले, ‘विरोधी पक्ष नेत्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही.
पण नारायण राणे यांचे चिरंजीव निष्पाप आहेत तर ते लपून का बसले आहेत? पोलिसांच्या समोर का येत नाहीत? ज्या पद्धतीनं ते म्याव म्याव करत होते, आता ते लपून का बसले आहेत?’, असं गुलाबराव पाटील म्हणाले.