तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अनेक अफगाण नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सर्वत्र हाहाकार माजला असून, अफगाण नागरिक देश सोडून देत जीव वाचवण्याची धडपड करत आहेत. अफगाणिस्तानमधील विमानतळावरची दृश्ये ही चिंता वाढवणारी आहेत. कधी एकेकाळी याच अफगाणिस्तानमध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग झाले होते. ‘खुदा गवाह’ या चित्रपटाचे शूटिंग अफगाणिस्तानमध्ये झाले होते. त्यावेळी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आता एवढी गंभीर नव्हती, परंतु फारशी चांगली नव्हती. तालिबानींमार्फत गोळीबाराच्या घटना या सर्रास होत होत्या. ‘खुदा गवाह’च्या अफगाणिस्तानमध्ये झालेल्या शूटिंगचे अनुभव खुद्द अमिताभ यांनी २०१३ साली एका फेसबुक पोस्टद्वारे सांगितले होते. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले व निर्माता मनोज देसाई यांनीही या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात घडलेल्या घडामोडींना नुकताच उजाळा दिला आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘खुदा गवाह’ या चित्रपटामध्ये जेलर रणवीर सिंह सेठी ही भूमिका साकारली होती.
श्रीदेवी यांची आईसुद्धा या शूटिंगच्या अनुषंगाने खूप चिंतेत होती
या सिनेमाचे निर्माते मनोज देसाई यांनी शूटिंगच्या काळातील अनुभव एबीपी न्यूजसोबत बोलताना सांगितला. मनोज देसाई त्यावेळी म्हणाले की, या सिनेमाचे शूटिंग अफगाणिस्तानमध्ये व्हावे, अशी खुद्द अमिताभ बच्चन यांची तीव्र इच्छा होती. याकरिता अमिताभ यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत चर्चादेखील केली होती. कारण राजीव गांधी यांचे अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांच्यासोबत उत्तम संबंध होते, परंतु युध्दग्रस्त असलेल्या अफगाणिस्तानमध्ये आपला मुलगा शूटिंगकरिता जात आहे, ही गोष्ट ज्यावेळी अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन यांना समजली, तेव्हा त्या प्रचंड चिडल्या होत्या. जर माझ्या मुलाला काही झाले तर तू पुन्हा येऊ नकोस, तिथेच आत्महत्या कर, असे त्या अतिशय चिडून मला म्हणाल्या होत्या असे मनोज देसाई यांनी सांगितले. अभिनेत्री श्रीदेवी यांची आईसुद्धा या शूटिंगच्या अनुषंगाने खूप चिंतेत होती.
तालिबानी नेत्याने हेलिकॉप्टरमधून येऊन गुलाबाचे फूल दिले
शूटिंगच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त होता, परंतु इतका बंदोबस्त असून, अमिताभ आणि श्रीदेवीला पाहण्याकरिता प्रचंड गर्दी उसळली होती. शूटिंगच्या काळात अफगाणिस्तान सरकारने सुरक्षेकरिता कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, मात्र इतके असूनदेखील अमिताभ बच्चन यांना एका तालिबानी नेत्याने हेलिकॉप्टरमधून येऊन गुलाबाचे फूल दिले होते, अशी एक आठवणसुद्धा देसाई यांनी सांगितली.
अर्धी फौज रस्त्यावर तैनात केली होती
काबुलच्या अर्टल ब्रिजपासून तर मजार-ए-शरीफपर्यंत अफगाणिस्तानच्या बऱ्याच भागांमध्ये ‘खुदा गवाह’चे शूटिंग झाले होते. अमिताभ आणि श्रीदेवी मजार-ए-शरीफ या ठिकाणी शूटिंग करत होते. अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह अहमदजई यांनी त्यांच्या सुरक्षेकरिता अगदी देशाची अर्धी फौज रस्त्यावर तैनात केली होती.
तालिबानीही श्रीदेवीच्या प्रेमात
श्रीदेवी त्या दिवसांमध्ये अफगाणिस्तानात जणू शांतीचे प्रतिक बनली होती, असे म्हणतात की, तालिबानीही श्रीदेवीच्या प्रेमामध्ये होते. इतके की, तिचे नाव ऐकताच ते गोळीबार बंद करत असत.
Credits and. Copyrights -Maay marathi