मुंबई : महाविकासआघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत केल्यामुळे भाजपचे आमदार सभागृहात प्रचंड आक्रमक झाले होते. सरकारने चर्चा करण्याची पुरेशी संधी न देता हे विधेयक रेटून नेल्याचा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. आठवण ठेवा, सरकार बरखास्त नाही केलं तर माझं नाव बदला, असे जाहीर आव्हान यावेळी त्यांनी दिले.
तसेच एवढी बदमाशी आली आहे का? मी कोर्टात जाईन, सुप्रीम कोर्टात जाईन, असा इशाराही मुनगंटीवार यांनी सरकारला दिला.
विद्यापीठ सुधारणा कायदा अंमलात आल्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे विद्यापीठांचे प्रभारी कुलपती असतील. राज्यपाल हे विद्यापीठांचे कुलपती असतात. मात्र, महाविकासआघाडी सरकारने त्यांच्या अधिकारांना कात्री लावल्याने भाजपचा या विधेयकाला विरोध होता. त्यामुळेच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकार सडकून टीका केली.
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची भाषा केली. नरेंद्र मोदी इतके सहनशील आहेत, की लोकशाहीच्या मार्गानेच एखाद्याचा पराभव व्हावा, कायद्याची चोरवाट वापरू नये असं त्यांचं तत्व आहे. या सरकारने आत्तापर्यंत ९८ वेळा घटनाबाह्य वर्तणूक केली आहे. मला भीती वाटते की या केसेस घेऊन उद्या सर्वोच्च न्यायालयात कुणी गेलं, तर राष्ट्रपती सोडा, सर्वोच्च न्यायालयही म्हणू शकेल की राष्ट्रपती राजवटीसाठी राज्यात योग्य परिस्थिती आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.