पुणे : “ऑनलाइन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना जास्त गुण द्यावेत, अशी भूमिका राज्य शासनाने कधीही घेतलेली नाही.
कोरोनामुळे ऑनलाइन परीक्षांचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. हळूहळू आपण ऑफलाइन परीक्षांकडेच आले पाहिजे, हीच राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा कायमस्वरूपी असल्याचा गैरसमज करून घेतला असेल तर तो साफ चुकीचा आहे,” असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. शिक्षण राज्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे या शैक्षणिक वर्षाच्या सर्व परीक्षा आॉफलाइन पद्धतीने होतील, असे दिसत आहे. तसे झाल्यास विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी कमी होतील. आॉनलाइन परीक्षा देण्यात त्यांना असंख्य आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
केवळ महाविद्यालयेच नव्हे, तर शाळांच्या परीक्षाही आॉफलाइन व्हाव्यात, अशी शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांची मागणी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११९ व्या पदवी प्रदान समारंभानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील कोरोना स्थितीचा विचार करून ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा घ्याव्यात, असा मार्ग सुचवण्यात आला. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून परीक्षांबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना राज्य सरकारने दिल्या आहेतण असे ते म्हणाले.
ऑनलाइन की ऑफलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयात धरसोड झाल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक होऊ नये, त्यांची मानसिकताही लक्षात घ्यायला हवी, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यायला हवी, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी तसच यंदा विद्यार्थ्यांना आॉफलाइन पद्धतीने परीक्षा द्याव्या लागल्या आहेत. त्यामुळे ते त्रासून गेल्याचे जाणवत आहे.
“राज्यात विद्यापीठे व महाविद्यालये सुरू झाली; परंतु अद्याप वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही वसतिगृहात राहण्यास परवानगी मिळत नाही, हे खरे असले तरी ‘ओमायक्रॉन’मुळे सध्या देशात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाची तिसरी लाट आली तर क्वारंटाईन सेंटरसाठी वसतिगृह उपलब्ध होण्यास अडचणी येतील. त्यामुळे वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला जाणार असेही शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखवले.
लेखी तक्रारीनंतरच महाविद्यालयांवर कारवाई
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी किती व कोणत्या गोष्टींसाठी शुल्क आकारावे, याचे स्पष्ट आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत; मात्र तरीही काही महाविद्यालयांकडून नियमबाह्य व बेकायदेशीर शुल्क आकारणी करून विद्यार्थ्यांची पिळवणूक व फसवणूक केली जात असेल तर संबंधित विद्यार्थी व पालकांनी तंत्र शिक्षण सहसंचालक किंवा उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी. संबंधितांवर कारवाई केली जाईल,” असेही उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले. महाविद्यालये आमच्याकडून वाजवीपेक्षा अधिक रक्कम घेत आहेत, अशा तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण खात्याकडे केल्या आहेत.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.