संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड व मनसे यांच्यामधील संघर्ष आता वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पुण्यात येऊन हजेरी लावली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी जातीव्यवस्थेच्या विषयावर अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी फेसबुकच्या एका पोस्टद्वारे राज ठाकरेंवर थेट निशाणा साधला होता. प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मात्र पुण्यातील मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेतील पुणे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यामधून इच्छुक असणार्या तुला मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना पाहिले आहे. मी प्रवीण गायकवाड, असे सांगत होतास. तुला मनसेचे राज ठाकरे काय समजणार? लायकीमध्ये राहायचे, नाहीतर पुण्यामध्ये फिरणे मुश्कील करू, असा थेट इशाराच त्यांनी दिला.
रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केली टीका
राज ठाकरे नेहमी जातीपातीच्या पलीकडच्या राजकारणामधील घटना सांगतात. योग्य ते योग्य, रोखठोक बोलतात आणि चूक ते चूक स्पष्टपणे भूमिका मांडतात. एकविसाव्या शतकात महाराष्ट्राचे व्हिजन, भविष्याबाबत बोलतात. एकच जात-माणुसकी, महाराष्ट्र धर्म, तरीही काही असंतुष्ट लोकांना, बिनकामी लोकांना बोलायचे असेल, तर त्यांनी चौकटीतच बोलायचे. आपण जर आपली पात्रता सोडून बोलला, तर महाराष्ट्र सैनिक, राजदूत पात्रता सोडून जशास तसे छान उत्तर देतील. राज ठाकरे फक्त बोलत नाहीत, तर सत्य, वस्तुस्थिती पाहून रोखठोक बोलतात. नेहमीच काम प्रचंड करतात आणि उगाच लोक कृष्णकुंजवर येऊन आपल्या अडचणी मांडत नाहीत, कारण प्रश्न बरेच असणार तर उत्तर राज ठाकरे आहेत, अशा शब्दांत मनसेच्या महिला शहराध्यक्ष रूपाली पाटील-ठोंबरे यांनी सुनावले आहे.
प्रबोधनकारांचे वारस असल्याचादेखील विसर पडला आहे
राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला व सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्याकरिता महाराष्ट्रात पुन्हा एकदा सगळा संघर्ष उभा करण्याचा एक प्रयत्न करत असताना दिसत आहे. राज ठाकरे यांचे जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेसुद्धा आकलन नाही, अशी थेट टीकाच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे, मात्र हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा तसेच आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे वारस असल्याचादेखील विसर पडला आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी व पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारसरणीशी एकदम जवळीक साधणारी आहे हे नक्की, असेही प्रवीण गायकवाड म्हणाले.
हे सर्व राजकीय स्वार्थामधून केले गेले
महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासूनच जात ही गोष्ट होती, परंतु स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती, पण गेल्या वीस वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासह इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. राजकीय स्वार्थामधून हे सर्व केले गेले असून, जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा एक वेगळा भाग झाला आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थामुळे मोठा झाला आहे, असेही राज ठाकरे म्हणाले होते.
बाबासाहेब तुम्ही असाच इतिहास सांगत रहा
“सहा वर्षांचा असताना मी पहिल्यांदाच बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिले होते. त्याच्यानंतर कित्येक वर्षे मी त्यांना फक्त पाहत होतो, वाचत होतो आणि आता मला त्यांचा सहवास लाभला. बाबासाहेब इतिहास जरी सांगत असले, तरीही ते वर्तमानामध्ये भानावर यायला शिकवतात. इतिहासामध्ये ज्या चुका केल्या, त्या वर्तमानात करू नये हे सांगतात.” “इतिहासासोबत वर्तमानाच्या जगामध्ये आणणारा इतिहास बाबासाहेब सांगतात. दंतकथांना त्यांच्या लिखाणात वावच नाही. शिवचरित्र बऱ्याच जणांनी लिहिले, परंतु बाबासाहेबांनी ते घराघरांत आणि मनामनांत पोहोचवले. बाबासाहेब तुम्ही असाच इतिहास सांगत रहा. आमची नातवंडं, पतवंडं तुमच्यामार्फत असाच इतिहास ऐकतच राहती”, अशी इच्छादेखील व्यक्त करून राज ठाकरेंनी बाबासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Credits and. Copyrights – Maay Marathi