तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसागणिक बिकट बनत चालली आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेले बरेच लोक आपला देश सोडण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत, परंतु चहूबाजूंनी मार्ग बंद केल्याने त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीमध्ये काही लोक आधीच अफगाणिस्तान सोडून अन्य देशामध्ये गेले आहेत. उमेद हा देखील असाच एक अफगाण नागरिक असून, जो पाच महिन्यांपूर्वी भारतात आला होता. या ठिकाणी आल्यानंतर त्याने आता दिल्लीच्या लाजपत नगरमध्ये फ्रेंच फ्राईज विकण्याचे काम सुरू केले आहे. जर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा गेलो तर ते आपल्याला जिवंत ठेवणार नाहीत, अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.
…पण तो आता चांगल्या नोकरीच्या शोधात
उमेद हा अफगाणिस्तानच्या एका स्पेशल फोर्सचा सैनिक होता. एनबीटीच्या वृत्ताप्रमाणे, तो आता दिल्लीमध्ये फ्रेंच फ्राईज विकून एका दिवसाला जवळपास तीनशे रुपयांची कमाई करत आहे. या व्यतिरिक्त तो आता हिंदी भाषा शिकण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे. उद्या काय होईल यासंदर्भात आपल्याला काहीच माहीत नाही, पण तो आता चांगल्या नोकरीच्या शोधात असून, सुरुवात कुठून आणि कशी करायची याचे उत्तरसुद्धा त्यांच्याकडे नसल्याचे उमेदने सांगितले.
अठराव्या वर्षी अफगाणिस्तान सैन्यामध्ये दाखल
उमेदने पुढे सांगितले की, तालिबानसोबतच्या लढ्यात युद्धभूमीवर मरण पावलेल्या मित्रांची आपल्याला प्रचंड आठवण येते. त्याने पुढे सांगितले की, आपण दोन वर्षांचा असताना त्याचे आई -वडील एका रस्ते अपघातामध्ये मरण पावले असून, तो अठराव्या वर्षी अफगाणिस्तान सैन्यामध्ये दाखल झाला होता. आता तो निर्वासित कार्डच्या मदतीने दिल्लीमध्ये राहत आहे.
तालिबानी मला जिवंत सोडणार नाहीत
उमेदने पुढे सांगितले की, अफगाण सैन्यामध्ये काम करताना आपण बऱ्याच ठिकाणी तैनात होतो. त्याने लढताना बऱ्याच तालिबानी सैनिकांना ठार केले आहे. त्यामुळे तो आता तालिबानच्या हिटलिस्टवरही आहे. त्याच्याकडे युद्धभूमीवरील काही व्हिडिओदेखील आहेत, परंतु अफगाणिस्तानात पुन्हा गेलो, तर जिवंत परतणार नाही. तालिबानी मला अजिबात जिवंत सोडणार नाही, असेही त्याने म्हटले आहे. यावेळी त्याने आपल्या शरीरावरील जखमासुद्धा दाखवल्या आहेत. तालिबानसोबत लढताना त्याला कधीही गोळी लागली नाही, परंतु छर्रे बऱ्याचदा लागले असल्याचे त्याने सांगितले आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.