बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजीसुद्धा नियमितपणे घेत असते. त्या अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब सतत करण्यात येत असतो. यासंदर्भात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जनजागृतीपर आणि दंडात्मक कारवाई सातत्याने करण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यांसारख्या वेगवेगळ्या रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून महापालिकेच्या माध्यमातून २०० रुपयांचा दंड सध्या आकारण्यात येत आहे. गेल्या नऊ महिन्यांमध्ये १९ हजारांपेक्षा जास्त व्यक्तींकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल तब्बल ३९ लाख १३ हजार १०० रु. एवढा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त संगीता हसनाळे यांनी दिली आहे.
प्रभावी जनजागृती करण्याचे आदेश
यासंदर्भात एका जनहित याचिकेप्रकरणी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई जास्त तीव्र करण्याबरोबरच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तरीही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी आवर्जून मास्क वापरावे, सतत हात धुवावेत अथवा सॅनिटाईज करावेत. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून दंड वसुली
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम ४६१ अंतर्गत ‘बृहन्मुंबई स्वच्छता व आरोग्य उपविधी-२००६ तयार करण्यात आले आहेत. या नियमांची जास्तीत जास्त प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय कार्यवाही करीत असते. याच उपविधीतील क्रमांक ४.५ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींकडून २०० रुपये एवढी दंड वसुली करण्यात येते. यानुसार गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत ३९ लाख १३ हजार १०० रु. इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. या अंतर्गत सगळ्यात जास्त दंड वसुली ही प्रामुख्याने कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘ए’ विभागामधून करण्यात आली आहे. या वॉर्डमध्ये ६ लाख १५ हजार ८०० रुपये एवढी दंड वसुली करण्यात आली आहे. त्याखालोखाल ‘एल’ विभागामधून रुपये ६ लाख १२ हजार २००, तर ‘सी’ विभागामधून रुपये ४ लाख ५२ हजार २०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com