मुंबई : मुंबईत २००८ ते २०१८ या दशकात निरनिराळ्या ठिकाणी एकूण ४८,४३४ आगीच्या दुर्घटना घडल्या. यात ६०९ मृत्यू, तर ८९ कोटी चार लाख ८६ हजार १०२ रुपये इतक्या मालमत्तेचे नुकसान झाले. त्यातील १,५६८ आगीच्या दुर्घटना गगनचुंबी इमारतींमध्ये घडल्याचे माहितीचा अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई महापालिकेकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या एकूण ४८,४३४ घटनांमध्ये, १५६८ गगनचुंबी इमारती, ८७३७ निवासी इमारती, ३८३३ व्यावसायिक इमारती आणि ३१५१ झोपडपट्टींचा समावेश आहे. यामध्ये शॉर्टसर्किटमुळे ३२,५१६, गॅस सिलिंडरमधून गळती १११६, तर ११,८८९ अन्य कारणांचा समावेश आहे.
तपशीलवार माहिती
परिमंडळ १च्या हद्दीत ९,८८७ आगीच्या दुर्घटना घडल्या असून यापैकी ३२५ दुर्घटना गगनचुंबी इमारत, १,५४६ दुर्घटना रहिवासी इमारतीत, ९८७ दुर्घटना व्यावसायिक इमारतीत आणि ७५ दुर्घटना झोपडपट्टीत घडल्या आहेत. परिमंडळ २च्या हद्दीत सर्वाधिक १०,७१९ आगीच्या दुर्घटना घडल्या असून त्यापैकी १२९ गगनचुंबी इमारती, १,८२४ निवासी इमारती, ६६४ व्यावसायिक इमारती आणि ९३४ झोपड्यांचा समावेश आहे. परिमंडळ ३च्या हद्दीत ८,७१७ आगीच्या घटना घडल्या असून त्यात ४९६ गगनचुंबी इमारती, १,३८२ रहिवासी इमारती, ९३९ व्यावसायिक इमारती आणि ४४३ झोपड्यांचा समावेश आहे. तसेच परिमंडळ ४च्या हद्दीत एकूण ८,३२८, परिमंडळ ५च्या हद्दीत ५,६८३, तर परिमंडळ ६च्या हद्दीत एकूण ५,१०७ आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत.
परिमंडळ ३मध्ये सर्वाधिक म्हणजे ४९६ गगनचुंबी इमारतींमध्ये आग लागली होती. तर परिमंडळ ४च्या हद्दीतील १८३५ निवासी इमारतींना आगीची झळ बसली होती. परिमंडळ १मधील सर्वाधिक म्हणजे ९८७ व्यावसायिक इमारती, तर परिमंडळ ५मध्ये सर्वाधिक १२७३ झोपड्यांना आग लागली होती.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.