इस्लामपूर : माझ्या भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याच्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही क्रांतीची सुरुवात आहे. संपूर्ण महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. येत्या चार महिन्यात ठाकरे सरकारमधील अर्धे मंत्री गायब झालेले असतील तर अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल करण्यासाठी कोल्हापूरला निघालेल्या सोमय्या यांनी इस्लामपूर जवळील वाघवाडी फाट्यावर भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
सोमय्या म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची शपथ घेतली आहे. इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळा महाराष्ट्र भ्रष्टाचार युक्त करून टाकला आहे. हे सगळे चोर, लुटेरे आणि हत्या करणारे आहेत. माझ्याबाबत त्यांनी फार नाटके केली.वाशीमला मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मी डगमगणार नाही. गेल्या वर्षभरात आम्ही ठाकरे सरकारचे २४ घोटाळे बाहेर काढले आहेत. त्याची चौकशी आणि कारवाई सुरू झाली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख गायब होतात, देशमुख कुठे आहेत याचा पत्ता फक्त ठाकरे आणि शरद पवार यांनाच माहीत आहे. ते म्हणाले, मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग फरारी होतात. मुश्रीफ रुग्णालयात दाखल झालेत. आता यापुढे अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसेल. हे सगळे भ्रष्टाचारी आहेत. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, रणधीर नाईक, संजय हवालदार, धैर्यशील मोरे, अशोक खोत, सतेज पाटील, अजित पाटील, मधुकर हुबाले, सचिन सावंत, अक्षय पाटील, चंद्रकांत पाटील, भास्कर मोरे, प्रविण परीट, अमित कदम, सी.एच.पाटील उपस्थित होते.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.