कळवा पूर्व येथील इंदिरा नगरमधील माँ काली चाळीवर काल रात्री दरड कोसळली. त्यामध्ये ६ घरांचे नुकसान झाले आहे, तर २५ घरांमधील कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कळवा पूर्व भागातील इंदिरा नगरातील माँ काली चाळ भागात घरांवर दरड कोसळून ६ घरांचे नुकसान झाले. सदर घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दलाच्या जवानांनी वीस ते पंचवीस जणांना गोलाई नगर या भागात ठाणे महापालिकेच्या शाळेमध्ये हलविले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, या घटनेनंतर मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मातीचा ढिगारा तातडीने उपसण्यात येत आहे. डोंगराळ भागामध्ये ही वस्ती असल्यामुळे या परिसरात आणखी दरड कोसळण्याची शक्यता तर नाही ना? याचीही तपासणी करण्यात येत आहे. याच परिसरातील काही अंतरावर घोलाई नगर भागात दरड कोसळून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने ठाण्यामधील डोंगरपट्ट्यांमधील भागामध्ये नोटिसासुद्धा बजावल्या होत्या.
जीव गेल्यावर सरकारला जाग येणार आहे का?
भूमाफियांमुळे अशी घरे डोंगर भागात उभारण्याचे काम होत आहे. त्यांच्यावर पहिली कारवाई करावी, अशी मागणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्याचसोबत पालक मंत्री एकनाथ शिंदेंसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीसुद्धा या भागात पाहणी केली होती, तर दुसरीकडे राज्य सरकारने डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या भागातील स्थानिक करत आहेत. एखाद्याचा जीव गेल्यावर सरकारला जाग येणार आहे का? असा संतप्त सवालही या भागातील स्थानिकांनी केला आहे.
डोंगर खचून दरड कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडतात
यापूर्वी महाड तालुक्यामधील तळीये व चेंबूरच्या लाल डोंगर परिसरामध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. पावसाळ्यात डोंगराची जमीन खचून दरड कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. दरडप्रवण क्षेत्राची पाहणीदेखील शासनाकडून केली जात आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com