नॉटिंगहॅममध्ये सुरु असलेलया भारत आणि इंग्लंड संघात पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा डाव १८३ धावांत आटोपला आहे. कर्णधार जो रूट वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ४ बळी तर शमीने ३ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हाच निर्णय त्याच्या अंगउलट आला. इंग्लंडकडून रोरी बर्न्स आणि झॅक क्रॉले यांनी सलामी दिली. भारताचा तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. बर्न्सला बुमराहने शून्यावर पायचित पकडले. बर्न्सने पाच चेंडू खेळले, पण त्याला एकही धाव घेता आली नाही. बर्न्सनंतर झॅक क्रॉले मैदानात आला. तो स्थिरावला असताना मोहम्मद सिराजने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. क्रॉलेने ४ चौकारांसह २७ धावा केल्या.डॉमिनिक सिब्ले वैयक्तिक १८ धावांवर माघारी परतला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याला राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडच्या डावाला आधार दिला. या दोघांनी ७२ धावांची भागीदारी रचली. चहापानापर्यंत जो रूटने आपले अर्धशतक पूर्ण केले. तर शमीच्या गोलंदाजीवर बेअरस्टो माघारी परतला. त्याने २९ धावा केल्या.
चहापानानंतर इंग्लंडची एक बाजू सांभाळणारा रूट माघारी परतला. रूटने ११ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. मुंबईकर गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याला पायचित पकडले. त्यानंतर एका बाजूने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले. सॅम करनने ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २७ धावांची आतषबाजी खेळी करत सामन्यात रंगत निर्माण केली. बुमराहने जेम्स अँडरसनची दांडी गुल करत इंग्लंडचा डाव संपवला.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.