नेशन न्यूज़ मराठी टिम.
डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे – डोंबिवली हे सगळ्यात जास्त गर्दीचे रेल्वे स्थानक मानले जाते. पुरुष नोकरदार वर्गाबरोबरच महिला नोकरदार वर्गाची संख्या देखील डोंबिवली स्थानकात अधिक आहे. मात्र महिलांसाठी रेल्वेच्या सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे महिला दिनानिमित्त रेल्वे प्रवासी महिला संघटनेतर्फे काळी फित लावून निषेध आंदोलन करण्यात आले.
उपनगरीय महिला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सकाळ-संध्याकाळ गर्दीमुळे महिलांना प्रवास करणे फारच जिकरीचे झाले आहे आणि याची दखल शासन तसेच रेल्वे प्रशासन हे गांभीर्याने घेत नाही.महिला प्रवासी संघटनेच्यावतीने महिलांच्या सुखसुविधांबाबत रेल्वे प्रशासनला आक्टोम्बर 22 ला निवेदन दिले होते यावर सहा महीने उलटून सुद्धा एकही बैठक आयोजित करण्यात आली नाही.
डोंबिवली स्थानकातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाची संख्या देखील अधिक आहे. असे असले तरी रेल्वेने महिलांसाठी अद्यापही डबे वाढवलेले नाहीत. इतकेच नव्हे तर महिलांसाठी सुरू केलेली लेडीज स्पेशल ट्रेन तीस वर्षे सुरू असली तरी अद्यापही केवळ एकच आहे. लेडीज स्पेशल लोकल एकच असल्याकारणाने ती लोकल खच्च भरून जाते. वाढत्या लोकसंखेच्या मानाने लेडीज स्पेशल लोकलच्या फेर्या वाढविणे काळाची गरज आहे.
त्याच बरोबर रेल्वे स्थानकावरही विविध समस्यांचा सामना महिला प्रवाशांना करावा लागतो. रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वच्छ शौचालयांची सोय नाही. कधी कधी तरी शौचालय चक्क कुलूप बंद अवस्थेत दिसून येतात. अशा वेळी महिलांची फारच कुचंबना होताना दिसते.महिलांचे डब्यांमध्ये पुरुष फेरीवाले निर्धास्तपणे चढत आहेत व याची तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. यासाठी आज महिला प्रवासी संघटनेतर्फे डोंबिवली रेल्वे स्थानकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काळ्याफिती लावून हे निषेध आंदोलन केल्याचे प्रवासी महिला संघटनेच्या अध्यक्षा लता आरगडे यांनी सांगितले. महिलांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढावा असे आवाहनही यावेळी प्रशासनाला केले आहे.
Copyrights & Credits – nationnewsmarathi.com