मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्याचे महापाप या महाविकास आघाडी सरकारने केले असून, टक्केवारीच्या मोहापायी बोगस कंपनीला कामे द्यायची आणि त्यातून हे असले गोंधळ घालायचे हाच महाविकास आघाड सरकारचा ‘भ्रष्टाचारी पॅटर्न’ बनला असून आरोग्य विभागाच्या परीक्षेतील या गोंधळाला महाविकास आघाडी सरकार व आरोग्य मंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागातील सर्व रिक्त जागा दोन महिन्यात भरणार अशी वल्गना करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सहा महिने उलटून गेल्यानंतर आज केवळ क व ड वर्गाच्या ६१९१ पदांसाठी परीक्षा घोषित केली होती. परंतु देशातील ६ राज्यांमध्ये काळ्या यादीत असलेल्या व अनेक गुन्हे नोंद असलेल्या न्यासा या कंपनीला महाराष्ट्रातील परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले.
यापूर्वी अनेक राज्यात या न्यासा कंपनीने परीक्षांमध्ये गोंधळ घातला असून या कंपनीला काम का देण्यात आले असा प्रश्न सुद्धा मी मागील अधिवेशनात विचारला होता, परंतु राज्य सरकारने त्याकडे कानाडोळा गेला. या परीक्षेबाबत विद्यार्थ्यामध्ये प्रचंड गोंधळ असून परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही, अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळाले नाही, प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही त्यामुळे नक्की परीक्षा कशी द्यायची असे प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले असल्याची कल्पना मी स्वतः राज्य सरकारला दिली होती परंतु त्याकडे सुद्धा कानाडोळा करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. त्यामुळे परीक्षेला अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, परीक्षा नक्की कधी घेणार याची २४ तासांच्या माहिती द्यावी व काळ्या यादीतील कंपनीला कोणी काम दिले याची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी आग्रही मागणी सुद्धा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.