अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचं कुपोषणाच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. खासदार नवनीत राणा यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांना प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुंना शासनातर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार आणि अन्य आवश्यक वस्तू न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यात मेळघाटात 49 नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याचा खासदार नवनीत राणा यानी तक्रार केली. उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या आणि महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी आणि व्यंकटेश या कंपन्यांना पळवाट शोधून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून कंझुमर फेडरेशनच्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम दिले गेल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण विकासमंत्री यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांच्याच गृह जिल्ह्यात इतक्या बालकांचा कुपोषणाने मृत्यू होणे ही गोष्ट अत्यंत खेदजनक आणि लाजिरवाणी असल्याचंही खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. कंझुमर फेडरेशन मार्फत देण्यात आलेल्या या पुरवठा कंत्राटात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून पालकमंत्री यशोमती ठाकूर या प्रथमदर्शनी दोषी असल्याचे आरोप त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या योजनेत केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा प्रत्येकी 50% रकमेचा निधी समाविष्ट असतो आणि एकप्रकारे ही केंद्र शासनाची फसवणूक असून यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जातीने लक्ष घालावे आणि या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरपणे कार्यवाही करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com