मुंबईत क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्याचे काम राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाकडून करण्यात आले, परंतू मुंबईत अशा प्रकारे अंमली पदार्थाची सर्रास तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे अंमलीपदार्थ विरोधी पथक आणि गृहमंत्री झोपले आहे काय? आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत काढण्याचे सोडून ठाकरे सरकार हे केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न असल्याचा आरोप मुंबई भाजपा प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
“मागील वर्षभराच्या काळात राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ४२ पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकून राज्यातील बॉलीवूड व उद्योग विश्वात वाढत चाललेल्या ड्रग्सच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला, किमान त्यांनंतर तरी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अंमली पदार्थांची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता होती.
परवा एनसीबी कडून टाकण्यात आलेल्या छाप्यात आर्यन खानसह अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याकडून मोठ्या अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. इतकेच नव्हे तर मागील दोन वर्षांपासून हे सर्व युवक अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे उघड झाले आहे. मुंबई सारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे,” असं भातखळकर म्हणाले.
“मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्सचे उत्पादन व तस्करी या विरोधात जोरदार कारवाई करणे अपेक्षित असताना ते सुद्धा केवळ गृह विभाग मात्र हॉटेल व बार मालकांकडून वसुली करण्यात धन्यता मानत आहे. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश व इतर प्रवक्ते यांनी तर थेट आर्यन खानच्या बाजूने उभे राहत जणू अंमली पदार्थ तस्करी व सेवनाला कॉंग्रेसचा पाठींबा असल्याचे दाखवून दिले आहे,” असा आरोप त्यांनी केला.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.