स्रोत: रत्नागिरी खबरदार
मुंबई : आरोग्य विभागातील पदे भरण्यासाठी सुरु असलेल्या परीक्षा प्रक्रियेतील गोंधळाची मालिका चालूच असून या परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या न्यासा कंपनीने एवढे घोळ घालूनही या कंपनीलाच कंत्राट देणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
श्री. भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, आरोग्य विभागातर्फे परीक्षा घेण्याचे कंत्राट न्यासा कंपनीला देण्यात आले आहे. याच कंपनीला हे कंत्राट मिळावे यासाठी २१ वेळा निविदा मागविल्या गेल्या आहेत. हा अट्टाहास केवळ न्यासा ला कंत्राट देण्यासाठीच केला गेला आहे. या कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षा प्रक्रियेत तीनदा गोंधळ झाल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. एवढा घोळ घालणाऱ्या न्यासा कंपनीलाच कंत्राट देण्याच्या आरोग्यमंत्री टोपे यांच्या निर्णयाचा ‘अर्थ’ विद्यार्थ्यांना व जनतेला कळू लागल्याने श्री. टोपे यांची न्यायालयीन चौकशी करणे आवश्यक आहे.
आरोग्य विभागाच्या गट ड साठी रविवार ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी वितरीत करण्यात आलेले प्रवेश पत्र (हॉल तिकीट) ग्राह्य न धरण्याचे संदेश विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहेत. २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या परीक्षेवेळी अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांना वेळेत प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नसल्याचे उघड झाले. उमेदवारांच्या आसन व्यवस्थेमध्येही गोंधळ उडाल्याच्या घटनाही घडल्या. या कंपनीच्या घोळामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्कीही सरकारवर ओढविली होती. एवढे होऊनही आरोग्यमंत्र्यांकडून ‘न्यासा’ लाच परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यासाठी आग्रह धरला जातो हे धक्कादायक आहे, असेही श्री. भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.