मुंबई : शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. राऊत यांची कन्या पूर्वश्री हिचा आज २९ नोव्हेंबर रोजी विवाह होत आहे. मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं आयोजित संगीत कार्यक्रमात संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. महाविकास आघाडीतील या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या व्हिडिओवरुन खोचक टोला लगावला आहे. पूर्वश्री राऊत यांचा विवाह आज संपन्न होईल.
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पुत्र मल्हार यांच्यासोबत त्या लग्न बंधनात अडकतील. लग्नाआधी संपन्न झालेल्या संगीत कार्यक्रमाला राज्यातील बडे नेते उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचा डान्स लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरला. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर, अनेकांनी सोशल मीडियातून कौतुक केलंय, तर काहींना टीकाही केली आहे.
मात्र, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट टीका करत, दोन्ही नेत्यांना लक्ष्य केलंय. राज्यात “एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता, असे म्हणत विखेपाटील यांनी नेत्यांना सुनावले. तसेच, एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?”, अशा शब्दात विखे पाटलांनी सुळे-राऊत यांच्या डान्स व्हिडिओवर खरमरीत टीका केली.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.