मुंबई : मुंबई ड्रग्स केसमध्ये गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. त्यातच आज नवाब मलिक यांनी एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेले निनावी पत्र प्रसिद्ध करत समीर वानखेडेंवर खोट्या केस दाखल करणे पैशांच्या वसुलीसह अनेक गंभीर आरोप केले. दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या बेछूट आरोपांना आता समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. असं निनावी पत्र कुणीही लिहू शकतं.
पत्र लिहिणाऱ्याने समोर येऊन आरोप करावेत, असे आव्हानही क्रांती रेडकर म्हणाल्या. या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेल्या निनावी पत्राबाबत क्रांती रेडकर म्हणाल्या की, समीर वानखेडेवर करण्यात आलेले आरोप खोटे आहे. अशा प्रकारचं निनावी पत्र कुणीही पाठवू शकतो. ज्या पत्रावर कुणाचेही नाव नाही, कुणीही जबाबदारी घेत नाही, अशा पत्रावर आणखी काय बोलणार, आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत, असे आव्हान क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना दिले. आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांना आमच्याकडून शुभेच्छा.
मात्र त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते कोर्टात सादर करावेत. ते असे ट्विटरवर, मीडियामध्ये प्रसार प्रसारित करून वेळ वाया का घालवताहेत. या संपूर्ण प्रकरणात आम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. समीर वानखेडे यांना एनसीबीमधून हटवल्यास अनेकांचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा प्रकार सुरू असल्याचा दावाही क्रांती रेडकरने केला.
आज सकाळी नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबाबत अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. समीर वानखेडेंच्या कारवायांबाबत एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करता पाठवलेले पत्र प्रसिद्ध करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केला होता.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.