चातुर्मासामधील व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांचा श्रावण सरला की, सर्वांना वेध लागतात ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. भाद्रपद चतुर्थीला श्रीगणेशाची पार्थिव पूजा केली जाते, परंतु त्यापूर्वी भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करणे अगदी प्राचीन काळापासूनची परंपरा आपल्याकडे आहे. कुमारिका व महिला हे व्रत करतात. देशाच्या अनेक राज्यांमध्ये हरितालिका व्रत आवर्जून साजरे केले जाते. हरितालिकेच्या व्रतामध्ये उमा-महेश्वर यांचे पूजन केले जाते. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागामध्ये राहणाऱ्या बऱ्याच कुटुंबांत गणपतीच्या दिवशी उमा-महेश्वराचे पूजन केले जाते. उमा-महेश्वराचे पूजन केल्याशिवाय गणपतीचे पूजन केले जात नाही, अशी प्रथा फार आधीपासूनच आहे. हरितालिका व्रताचरणामध्ये संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करून दुसऱ्या दिवशी पारणे करण्यात येते. हरितालिका व्रत नक्की कसे करावे? व्रतामागील आशय नेमका काय? व्रतकथा, पूजाविधी व आरती यांसंदर्भात आज आपण जाणून घेऊया…
हरितालिका व्रताची शुभ वेळ
यंदा गुरुवार म्हणजेच ९ सप्टेंबर २०२१ रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरीही शिव-पार्वतीची उपासना म्हणून हे व्रत केले जाते. पंचांगाप्रमाणे, भाद्रपदामधील शुक्ल पक्षाची तृतीया तारीख बुधवार, ८ सप्टेंबर रोजी बुधवारी पहाटे ३.५९ वाजता असेल. जे दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, ९ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून चौदा मिनीटपर्यंत राहील. त्यानंतर चतुर्थी तिथी लागेल. धार्मिक विद्वानांच्या मताप्रमाणे, चतुर्थी तिथी असलेली तृतीया तिथी अधर्म नष्ट करते. हरितालिका व्रत हे माता पार्वतीच्या कृपेमुळे भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा सण असून, दरवर्षी हा उपवास भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीला करण्यात येतो. या हरितालिका व्रतावर सुमारे तब्बल चौदा वर्षांनंतर रवि योगाचा दुर्मिळ योगायोग केला जात आहे. हरितालिका व्रताच्या पूजेकरिता योग्य वेळ संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटं ते सायंकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे. पंचांगाप्रमाणे, रवि योगाचा एक दुर्मिळ योग सायंकाळी ५.१४ पासून प्राप्त होणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये रवि योग फार प्रभावी मानला जातो. असेही म्हटले जाते की, रवि योगाने अनेक अशुभ योगदेखील निष्प्रभावी होतात.
हरितालिका व्रत कोणी करावा?
हरितालिकेचा व्रत कुमारिका, विवाहित स्त्रिया करतात. देशामधील बऱ्याच भागांमध्ये सखी व पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांची पूजा करण्याची पद्धती अगदी प्राचीन काळापासून आहे. सकाळी नित्योपचार उरकल्यानंतर हरितालिका व्रतपूजनाचा संकल्प करावा. पार्वती व तिची सखी यांच्या मातीच्या मूर्ती सुशोभित केलेल्या चौरंगावर त्याची स्थापना करण्यात येते, तर या दिवशी वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यात येते. पूजा करून हरितालिकेकरिता हिरव्या बांगड्या, वेगवेगळ्या झाडांची पत्री म्हणजे पाने वाहिली जातात. या दिवशी संपूर्ण दिवसभर स्त्रिया कडक उपवास करतात.
हरितालिका व्रत कसे करावे?
या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवेकोरे कपडे परिधान करतात. साजशृंगार करतात. पूजेकरिता चौपाटीवर केळीच्या पानांचा मंडप करून त्यामध्ये वाळूचे शिवपिंड करतात अथवा शिव-पार्वतीची प्रतिमा ठेवतात. हरितालिका व्रताच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करण्याची प्रथा असून, काही महिला निर्जळी उपवास करतात. कुमारिका चांगला पती मिळावा आणि विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे, संसार सुखाचा व्हावा, याकरिता हे व्रत करतात. वेगवेगळे खेळ खेळून रात्र जागविली जाते, गाणी म्हंटली जातात अथवा भजन-कीर्तन करतात. शेवटी कथा ऐकली जाते व आरती म्हणतात. यानंतर या मूर्तींचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते. त्यानंतर उपवास सोडला जातो. याला ‘पारणे’ असे म्हणतात.
हरितालिका व्रताची कहाणी काय?
हिमालय पर्वतराजाची कन्या म्हणजेच पार्वती ही उपवर झाली. तसेच नारदाच्या सल्ल्यामुळे तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूसोबत करण्याचा निर्णय घेतला, परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्यामुळे तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला होता की, तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. एवढेच बोलून ती थांबली नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने घरातून पळून गेली. शिवप्राप्तीकरिता अरण्यात जाऊन घनघोर तपस्या केली. सलग बारा वर्षे फक्त रूईची पाने चाटून पार्वतीने तपाचरण केले. दिवसभर कडक उपवास करून जागरण केले. तिच्या तपामुळेच महादेव प्रसन्न झाले. पार्वतीच्या विनंतीला मान देऊन महादेवांनी पत्नी म्हणून तिचा स्वीकारदेखील केला, अशी आख्यायिका आहे.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.