मुंबई : कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काजू उत्पादकांना अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्यामार्फत सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने व्याज सवलत योजना तयार करण्यात येणार आहे.
तसेच ओल्या काजूगराला अधिक किंमत मिळत असल्याने प्रायोगिकतत्वावर ओला काजूगर काढण्याच्या मिशन लुधियानावरुन मागविण्यात येणार आहेत. या मशिन मागविल्यानंतर ओला काजूगराचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणारे काजूचे वाण विकसीत करण्याच्या सूचना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.