महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी 21 नोव्हेंबरला होणार (Maha TET and NET) आहेत. राज्यातील शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा तर विद्यापीठ, कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) नेट परीक्षा देणे अनिवार्य आहे.
शिक्षण क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दोन्ही परीक्षा उपयुक्त आहेत. मात्र त्या एकाच दिवशी होत असल्याने विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडणार आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. मात्र यंदा टीईटी आणि यूजीसी नेट या शिक्षण क्षेत्राशी संबंधित दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. याची दखल घेत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि परीक्षा परिषदेला टीईटी परीक्षेची तारीख बदलण्याची सूचना केली आहे. दोन्ही परीक्षांसाठी खेडोपाडी, वाडीवस्ती तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. मात्र सध्या एसटी संपाचा फटका या परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांना बसणार आहे. एसटीची संप सुरूच राहिल्यास सार्वजनिक वाहतुकीचे साधन नसल्याने परीक्षा केंद्र गाठताना उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे परीक्षा परिषदेने लवकरात लवकर परीक्षेची तारीख बदलण्याची कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. (Maha TET and NET)
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.