मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून सर्वधर्मियांचे सण यावर्षी साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत (Maharashtra Govt Diwali SOP) .त्यामुळेच येणारा दिवाळी सणही तशाच पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन आधीच राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने दिवाळी सणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात दिवाळी यंदा साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करतानाच अनेक महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी यावर्षी फटाके टाळावे व दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावा, असे नमूद करण्यात आले आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या दिवाळीच्या मार्गदर्शक सूचना Maharashtra Govt Diwali SOP
- कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.
- दिपावली उत्सवादरम्यान खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यांवर गर्दी होत असते. तथापि, नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी.
- ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.
- दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. कोरोनाबाधित नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा.
- “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत.
- दिपावली पहाट आयोजित करताना मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. या कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.
- सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी.
- कोविड- 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी दिलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.
स्रोत: रत्नागिरी खबरदार