मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढत होत असताना सरकारने खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने सरकारने काही निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. (Maharashtra Home quarantine Guidelines)
राज्यात आता होम क्वारंटाइनचा कालावधी आता सात दिवसांचा करण्यात आला आहे. या आधी हा कालावधी 10 दिवसांचा होता. सात दिवसांच्या होम क्वारंटाईननंतर संबंधित व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मागील काही दिवसांपासून राज्यात बाधितांची संख्या वाढत आहे. तीन दिवसात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेश टोपे यांनी काय म्हटले ? (Maharashtra Home quarantine Guidelines)
◼️ मागील काही दिवसांपासून राज्यात बाधितांची संख्या वाढत आहे. तीन दिवसात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, त्यातील 90 टक्के लोकांना लक्षणे नाहीत. उर्वरित 10 टक्क्यांमध्ये 1-2 टक्के रुग्णालयात उपाचारासाठी दाखल आहे. ही एका अर्थाने सकारात्मक बाब आहे.
◼️ अँटिजन टेस्ट करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. यासाठी आता चौका चौकात अँटिजन चाचणीसाठी बुथ उभारण्यात येणार आहे. अँटिजन पॉझिटिव्ह आल्यास RTPCR चाचणी करण्याची गरज नाही.
◼️ ज्यांची लस झालेली नाही त्यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक असल्याचे टोपे यांनी सांगितले. ज्यांना ज्या भाषेत समजतं, त्यांना त्याच भाषेत समजवणार असल्याचाही इशारा राजेश टोपे यांनी दिले.
◼️ लॉकडाऊनची आज गरज नाही. पण रुग्णसंख्या पाहून निर्बंध लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निर्बंध तातडीने लागू होणार नाहीत. योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार आहे
◼️ सध्याच्या नियमांप्रमाणे बुस्टर डोस शासकीय रुग्णालयात घ्यावे लागणार आहे. मात्र, खासगी रुग्णालयांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस त्यांच्याच रुग्णालयात देण्यास परवानगी देण्यात आली आहे.
◼️ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळावी लागणार आहे.
टास्क फोर्स सोबत राज्यातील कोरेनाचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला. उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देऊ नका. त्याचप्रमाणे निधीला कात्री लावू नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाला आजच्या बैठकीत दिल्या आहेत. (Maharashtra Home quarantine Guidelines)