बेळगांव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. या प्रकारामुळे सीमाभागात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध नोंदवला असून मराठी भाषिकांच्या वतीने उद्या, मंगळवारी बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यासाठी समिती कार्यकर्त्यांनी महामेळाव्याची व्हॅक्सिन डेपो येथे जय्यत तयारी केली होती. दरम्यान कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दळवी यांच्यावर काळी शाई फेकत हल्ला केला. यावेळी कर्नाटक सरकार बेळगावमधील मराठी जनतेवर अत्याचार करत असल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
करवे येथील कन्नड वेदिका रक्षण समितीच्या काही कार्यकर्त्यांनी दीपक दळवी यांच्याशी चर्चा करायचे असल्याचे सांगून बाजूला नेले. तेथे त्यांच्यावर शाई फेकून ते पळून गेले. हा प्रकार घडल्यानंतर उपस्थित मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कन्नड गुंडांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या.

एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दळवी यांचा अपमान हा समस्त मराठी भाषिकांचा अपमान असल्याचे सांगितले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. हल्लेखोरांवर शासनाने कडक कारवाई करावी अन्यथा त्यांना आमच्या ताब्यात द्यावे. त्यांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.