ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसची गरज नाही असे म्हणणाऱ्या महापौर नरेश म्हस्के यांना विस्मरण झाले असावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला आहे. श्री. म्हस्के राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच महापौर म्हणून बिनविरोध निवडून आले होते, असे ते म्हणाले.
मंगळवारी महासभा सुरु असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर नरेश म्हस्के यांनी आपणाला राष्ट्रवादीची गरज नाही, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला.
आनंद परांजपे यांनी सांगितले की, विस्मृती ही देवाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के! ज्या वेळी महापौरपदाची निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेचे नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांना फोन करुन शिवसेनेचा महापौर बिनविरोध व्हावा, अशी विनंती केली होती. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2019 रोजी एकनाथ शिंदे आणि उमेदवार म्हणून नरेेश म्हस्के हे तत्कालीन विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या दालनात आले. त्यावेळी आपणांसह गटनेते नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकदेखील उपस्थित होते. त्यावेळी शिंदे आणि म्हस्के यांनी, “राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे; त्यामुळे ठाण्यातही महापौरपदाची निवडणूक बिनविरोध करावी”, अशी विनंती केली. त्यावेळी राष्ट्रवादीने मोठ्या दिलाने निवडणुकीतून माघार घेत शिवसेनेला महापौरपद बिनविरोध पद्धतीने दिले. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2019 रोजी नरेश म्हस्के हे महापौर झाले. नरेश म्हस्के हे 17 नोव्हेंबर 2019 ची घटना विसरले असतील. म्हणून मी त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ही आठवण करुन देतो, असे परांजपे म्हणाले.
ठामपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. शिवसेनेच्या राजवटीत जी अनागोंदी चालली आहे. त्याची पोलखोल महासभा आणि ठाणेकरांसमोर करावी लागणारच आहे. अन् ती आम्ही करीत आहोत. कोविडच्या काळात ठामपा प्रशासनाकडून अनागोंदी कारभार करण्यात आला आहे आणि शासन म्हणून शिवसेनेचा त्यांच्यावर वचक नव्हता. सत्ताधारी शिवसेना दुटप्पी भावनेने वागत आहे; लसीकरण, विकासनिधीमध्ये सेनेकडून राजकारण केले जात आहे. याचा आक्रोश कधी ना कधी होणारच होता. कालच्या महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे बोलणे सुरु असताना सचिवांकडून महापौरांच्या इशार्यावरुन आवाज म्यूट केले गेले. म्हणून त्यांचा आवाज महासभेपर्यंत पोहचावा, यासाठी नरेंद्र सभागृहामध्ये राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक घुसले होते. महापौरांनी विकासनिधी रोखला होता, यासाठीही हे आंदोलन होते, असे परांजपे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या शाखा-शाखांमधून लसीकरण होत असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लसीसाठी मागणी केली की ती नाकारली जाते. लसीकरणाच्या ज्या चार बसेस आहेत. त्यापैकी दोन प्रशासनाने ठेवल्या आहेत. तर, दोन बसेस महापौरांनी स्वत:च्या अधिकारात ठेवल्या आहेत. त्या बसेसदेखील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना देण्यात आल्या नाहीत, म्हणूनच काल हा आक्रोश झाला. काल सभागृह नेते अशोक वैती यांनीदेखील कोविडच्या कार्यकाळात मोठमोठ्या ठेकेदारांची बिले अदा करण्यात आली आहेत, असा आरोप केला आहे. परिवहनची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना परिवहनची पाच कोटींची एफडी तोडून ठेकेदाराला बिले देण्यात आली, असा अनागोंदी कारभार आयुक्त डॉ. विपीन शर्मा करीत आहेत. आणि सत्ताधारी शिवसेनेचा त्यांच्यावर वचक नाही. त्यामुळेच सक्षम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी महासभेत आणि ठाणेकरांसमोर चुकीच्या निर्णयाचा विरोध करेल, असा इशाराही परांजपे यांनी दिला.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.