भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील शिवसेनेत परस्परपणे नियुक्त्या करण्याचा सपाटा लावणार्या जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि महिला संघटक स्नेहल कल्सारिया यांना या शहरातील संपर्क प्रमुख तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी चांगलाच दणका दिला आहे. सरनाईक यांनी या नियुक्त्या रद्द केल्याने प्रभाकर म्हात्रे आणि स्नेहल कल्सारिया यांचे आगामी महापालिका निवडणुकीत चांगलेच तीन तेरा वाजणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
सेनेमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह स्थानिक पातळीवरील काही महत्वाचे निर्णय शहरप्रमुखाला विचारात घेऊनच घेतले जातात. तशी परंपराच सेनेमध्ये बाळासाहेबांनी रुजविली असताना त्याला मीरा-भाईंदरमधील सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी छेद दिल्याचे उघड झाले आहे. त्यावर संतप्त झालेल्या सरनाईक यांनी सेनेतील या शिस्तभंगाची दखल घेत त्याविरोधात सेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पालकमंत्री शिंदे व पक्षाचे सचिव सुभाष देसाई यांच्याकडे तक्रार केली आहे. सेनेच्या परंपरेनुसार शहरप्रमुखांच्या परवानगीनंतरच स्थानिक स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातात. पण जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांनी परस्पर काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याचे पत्र स्वतःच्या लेटरहेडवर दिल्याचे समोर आले. याखेरीज महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत यांनी तर काही समाजकंटक महिलांचीच विविध पदांवर परस्पर नियुक्ती केली असून त्यातील काही महिलांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. हि बाब उघड होताच सरनाईक यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मीरा-भाईंदरमध्ये सुरु असलेल्या बेकायदेशीर नियुक्त्यांबाबत चर्चा केली. त्यात नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या वेळी संपर्कप्रमुखांना विश्वासात न घेता कोणत्याही नियुक्त्या करता येणार नाहीत यावर एकमत करण्यात आले. ज्या पदाधिकाऱ्यांची परस्पर नियुक्ती करण्यात आली आहे अशा लोकांनी पालकमंत्र्यांकडे जाऊन त्यांच्या हाती पत्र देऊन फोटो काढल्याप्रकरणी सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पालकमंत्र्यांना मात्र त्या नियुक्त्यांच्या बाबतीत कुठलीच कल्पना नसल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र शिवसेनेच्या नियुक्त्या या स्थानिक संपर्कप्रमुखांना विश्वासात घेतल्याशिवाय करण्यात येत नाहीत. ही शिवसेनेची शिस्त असताना मीरा-भाईंदर शहरामध्ये ही शिस्त मोडण्याची मुभा कोणालाही देण्यात आलेली नाही. बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला शिस्त लाऊन दिली असताना त्या शिस्तीचा भंग कोणीही केलेला संपर्कप्रमुख म्हणून आपण खपवून घेणार नसल्याचा गर्भित इशारा सरनाईक यांनी दिला आहे.
सेनेच्या नेत्यांमध्ये भांडणे लावण्याचे उपद्व्याप काही स्थानिक पदाधिकारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला असून तेच पदाधिकारी प्रसार माध्यमांना चुकीच्या बातम्या पुरवत आहेत. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून अयोग्य संदेश पसरवित असुन त्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार त्वरीत थांबवावा अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.