मुंबई : कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत. तथापि विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण पद्धती गरजेची झाली असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. याच जाणिवेतून ऑनलाईन शिक्षण पद्धतीत कोणीही वंचित राहू नये यासाठी धारावी काळा किल्ला मनपा शाळेतील 500 विद्यार्थ्यांना आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शैक्षणिक टॅब चे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, नगरसेवक वसंत नकाशे, महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, शिक्षणाधिकारी राजू तडवी, आयएएचव्हीच्या प्रमुख मीरा गुप्ता उपस्थित होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज (आयएएचव्ही) संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. आदित्य ठाकरे म्हणाले, कोविड ची परिस्थिती किती दिवस चालेल माहीत नाही. पण त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. यापूर्वी शाळेत शिकण्यासाठी टॅब दिले होते, परंतु आता ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब देण्यात येत आहेत. हा बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब गरजेचा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित लावले होते, त्यांच्या या जाणिवेचे आदित्य ठाकरे यांनी आवर्जून कौतुक केले.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.