कोल्हापूर : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरोधात सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र आहे. या सगळ्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत. मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असं सांगत ‘मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील होती’, असा गौप्यस्फोट मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.
चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सगळं सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात भाजप झिरो आहे, झेडपी नाही, महापालिका नाही, काहीच नाही शिल्लाक, त्यांना हटवण्याच्या हालचाली दिल्लीत सुरु होत्या, पण अमित शाहांच्या मैत्रीमुळे त्यांना हटवलं नाही, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.
सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे. किरीट सोमय्या हे चुकीचे आरोप करत आहेत. किरीट सोमय्या यांची स्टंटबाजी कशासाठी? विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न आहे, असंही मुश्रीफ म्हणाले.
माझे नेते शरद पवार, महाविकास आघाडी, परमबीर सिंग किंवा केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराबद्दल पत्रकार परिषदा घेऊन मी आवाज उठवला. त्यामुळे भाजप नेते मंडळी मला दाबण्याचा प्रयत्न करत होते. किरीट सोमय्या यांना टूल म्हणून भाजपने वापरलं असल्याचं मुश्रीफ म्हणाले.
मला डेंग्यू होता आणि अशक्तपणा होता. मी किरीट सोमय्यांचा आभारी आहे, त्यांनी मला तब्बेतीसाठी शुभेच्छा दिल्या, असंही मुश्रीफ म्हणाले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.