मुंबई : महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे. महाराष्ट्राच्या मातीत परंपरेने रुजलेल्या अनेक कला आहेत. देशपातळीवर महाराष्ट्राचे नाव अभिमानाने-गौरवाने घेतले जाईल, अशी लोककला आपण जपली पाहिजे. त्यासाठी लोककलेचा विभागानुसार एकत्रित आराखडा तयार करावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, भारत सरकार आणि शाहीर अमरशेख अध्यासन लोककला अकादमी संगीत विभाग मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शाहीर अमरशेख जयंती समारंभाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सामंत बोलत होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, आपली संस्कृती, लोककला विद्यापीठांनी जपली पाहिजे. महाराष्ट्रात अनेक मोठ्या ताकतीचे कलावंत आहेत. त्यांच्या कलेला योग्य ठिकाणी संधी देऊन अधिकाधिक लोकांपर्यत ती कला कशी पोहोचेल याचे योग्य नियोजन केले पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण घेणे जसे आवश्यक आहे, तसेच आपली बहुमोल संस्कृती टिकविणे देखील तेवढेच गरजेचे आहे.
त्यासाठी आपली लोककला जिवंत राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. राज्याच्या लोककलेचा सर्वसमावेशक आराखडा लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ यांनी तयार करावा. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन त्यासाठी लागणारी आर्थिक मदतही करण्यात येईल, असे आश्वासनही श्री.सामंत यांनी यावेळी दिले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.