महाविकास आघाडी सरकार आल्यापासूनच महाराष्ट्राला पणवती लागलेली असून, त्यामुळे आम्हाला कोणतेही कार्यक्रम साजरे करता येत नाही. दुसरीकडे आमदारांच्या नातेवाईकांचे लग्न सोहळ्याचे कार्यक्रम जोरदार साजरे होत आहेत. कोरोना विषाणूच्या काळामध्ये सणांवर संक्रांत आणलेली आहे, ही महाराष्ट्रवर आलेली संक्रांत आहे, अशी टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. दहीहंडी हा उत्सव कोरोना काळात होणार नाही, असा निर्णय घेणारे हे कोण? असा प्रश्न मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश आल्यास आम्ही दहीहंडी साजरी करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला. दहीहंडी समन्वय समिती बैठकीमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर यांनासुद्धा बोलू दिले गेले नाही. जागतिक रेकॉर्ड करणाऱ्या पथकाला देखील या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आमंत्रण दिले गेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो निर्णय घेतला आहे, त्यासंदर्भात मनसेच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.
बैठकीत नेमकं काय ठरलं?
दहीहंडी सण थाटामाटामध्ये साजरा करण्याकरिता शासनाने मुभा द्यावी अन्यथा आम्ही आंदोलन करू, अशी आक्रमक भूमिका दहीहंडी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व विरोधी पक्ष भाजपने घेतली. त्यावर जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्याकरिता आपण सण-वार, उत्सव काही काळाकरिता बाजूला ठेऊ, मानवता दाखवू व कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, अशी संयमी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. सणांबाबत आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच असून, आपले सण आपण जपलेच पाहिजेत. परंतु आता प्रश्न आरोग्याचा असून, याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्याने करावा लागेल, असेही म्हणत एकप्रकारे दहीहंडी साजरी करण्यावर निर्बंध असतील अथवा दहीहंडीकरिता मुभा नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
गोविंदा पथकांच्या ठाकरे सरकारकडे या पाच मागण्या
दहीहंडी सणासाठी काहीच दिवस उरले असताना गोविंदा पथकांच्या काही प्रमुख मागण्या त्यांनी राज्य सरकारपुढे ठेवल्या आहेत. गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींच्या मुख्यमंत्र्यांकडे प्रमुख पाच मागण्या आहेत. सर्वात प्रथम आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास मुभा मिळावी. दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्याकरिता सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पूर्ण करणे गरजेचे असून, तशी तयारीदेखील गोविंदा पथकांनी केली आहे. गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्याकरिता जाणार नाहीत. कोरोना संसर्गाचे भान ठेवूनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची मुभा देण्यात यावी. तर दहीहंडी फोडताना कोणत्याच प्रकारची गर्दी होणार नाही, याची पूर्णपणे काळजी गोविंदा मंडळे घेतील.
या बैठकीला केवळ सरकारचे समर्थन करणारे आजी-माजी आमदार
राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी थेट आव्हान दिले. महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारने कितीही रोखले तरीही यंदाची दहीहंडी होणार, असे राम कदम यांनी म्हटले. जनतेला अपेक्षा होती की, हिंदूंचा हा मोठा सण आहे व तो होईल. केवळ काही नियम आखून दिले जातील असे वाटले होते, परंतु तसं काही झालेच नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून मागणी करत आहोत. अपशकुनी वसुली सरकार बिअर बार उघडण्याकरिता नियम लावते. तर नियम लावून मंदिरं उघडायला काय हरकत आहे. हिंदू उत्सवच साजरा करायला निघालो आहोत तर सरकार त्यावर बंदी घालत आहे. आजची बैठक ही फक्त फसवणूक करणारी होती. या बैठकीला केवळ सरकारचे समर्थन करणारे आजी-माजी आमदार होते. अनेक मंडळांना त्यांनी विचारात घेतले नाही. चर्चासुद्धा करायची नाही व निर्णय घ्यायचा, मग बैठक घेता तरीही कशाला? असा प्रश्न राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
५०० गुन्हे दाखल करा, तुमच्या कोणत्याही धमक्यांना आम्ही भीक घालत नाही
फसव्या घोषणा करणारे व लोकांना फसवणारे हे सरकार आहे. बार उघडताना तिसरी लाट आडवी येत नाही, परंतु मंदिरं उघडण्याकरिता तिसऱ्या लाटेची भीती दाखवली जाते. दारूची दुकाने कोरोनाप्रुफ आहेत का? कोणत्याही परिस्थितीमध्ये घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सव होणारच. मग ५०० गुन्हे दाखल करा. तुमच्या कोणत्याही धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असा इशारा राम कदम यांनी दिला आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.