नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभाग आणि डॉ. डि.वाय.पाटील स्कुल ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरीझम स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या महिला मिनी मॅरेथॉन स्पर्धा 2023 मध्ये 550 हून अधिक विविध वयोगटातील महिलांनी सहभागी होत ही स्पर्धा यशस्वी केली.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार जागतिक महिला दिनी विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून विविध क्षेत्रामध्ये नावलौकीक मिळविणा-या महिलांचा सन्मान करण्यात आला होता. त्याचप्रमाणे जागतिक महिला दिनाला पूरक उपक्रम म्हणून डॉ.डि.वा.पाटील विद्यापिठाच्या उपाध्यक्ष श्रीम. शिवानी विजय पाटील यांच्या प्रेरणेतून या महिला विशेष मिनी मॅरोथॉन स्पर्धेचे आयोजन कऱण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्या हस्ते, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे यांच्या उपस्थितीत या मॅरेथॉन स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
डॉ.डि.वाय.पाटील ऑडिटोरियम पासून या महिला मिनी मॅरेथॉनची सुरुवात होऊन शनिमंदिर कमानीकडून एसबीआय कॉलनीच्या सर्व्हीस रोडने आर.आर.पाटील उदयान मार्गे डॉ.डि.वाय.पाटील स्टेडियमकडे व तिथून एल.पी. मार्गे डॉ.डि.वाय.पाटील ऑडिटोरियमपर्यंत ही महिला मिनी मॅरेथॉन धावली. यामध्ये स्नेहा विलास मिरगाव, सोनी पप्पू जयस्वाल व लच्छा हरिचरन राजधर या महिलांनी प्रथम 3 क्रमांक पटकावित विजेतेपद संपादन केले. त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे 40 वर्षे वयापुढील गटात 3 क्रमांक आणि 8 वर्षापर्यंतच्या लहान मुलींच्या वयोगटात व 70 वर्षावरील महिलांच्या वयोगटात सहभागी महिलांमधून एक संघ निवडण्यात येऊन त्यांना विजेतेपदाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. विविध वयोगटातील मुली व महिलांनी अत्यंत उत्साहाने सहभागी होत हा स्पर्धा उपक्रम यशस्वी केला.