मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. (MPSC exam postponed) कोरोना काळात या आधी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे.
अशा विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या 2 जानेवारीला होणारी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
परीक्षेची सुधारित वेळ, दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नाहीत. यामुळे उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. त्यांना परीक्षेस बसण्यास मिळावे म्हणून सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवार दिनांक ०२ जानेवारी, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२१ पुढे ढकलण्यात येत आहे, असे म्हटले आहे. याबाबतचा निर्णय 17 डिसेंबरला घेण्यात आला होता.